|| बाळासाहेब जवळकर
भाजप-राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला:- भाजपचा अभेद्य बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मावळ मतदार संघात गेल्या २५ वर्षांपासून भाजपचा आमदार आहे. यंदा भाजपचे राज्यमंत्री संजय ऊर्फ बाळा भेगडे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिल्याने पक्षात बंडाळी माजली आहे. मुख्यमंत्र्यांनी शिष्टाई केल्यानंतर एका बंडखोराने तलवार म्यान केली. दुसऱ्याने मात्र राष्ट्रवादीची उमेदवारी स्वीकारून आव्हान निर्माण केले आहे. मावळातील लढतीत काटय़ाची टक्कर असून हक्काचा गड राखण्यासाठी भाजपची तर मावळात विजयी पताका फडकावण्यासाठी आतुर असलेल्या राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.
मावळ मतदार संघात भाजपची ताकद तसेच राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे मोठे जाळे आहे. १९९५ पर्यंत मावळवर काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व होते. मात्र काँग्रेसमधील दुहीचा फायदा घेत भाजपने ते वर्चस्व मोडीत काढले. सलग १० वर्षे मावळचे प्रतिनिधित्व केलेले माजी मंत्री मदन बाफना यांचा १९९५ मध्ये भाजपच्या रूपलेखा ढोरे यांनी पराभव केला, तेव्हापासून भाजपचे पर्व सुरू झाले.
मावळात तिसऱ्यांदा कोणी आमदार होत नाही, असे मानले जाते. त्यामुळे यंदा बाळा भेगडे यांची उमेदवारी बदलली जाईल, असे वातावरण होते. मात्र, भेगडे मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय असल्याने तसे झाले नाही. त्यांना जाता-जाता मंत्रिपद देण्यात आले. याशिवाय, विरोधानंतर मावळची उमेदवारीही देण्यात आली. बाळा भेगडे यांच्यावर पुन्हा कृपादृष्टी झाल्याने भाजपमध्ये बंडाळी झाली. दोन वर्षांपासून आमदारकीच्या तयारीत असलेले भाजपचे तळेगावचे नगरसेवक सुनील शेळके यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि राष्ट्रवादीची उमेदवारी स्वीकारली. तर, युवा नेते रवी भेगडे यांनीही बंडखोरी करून नाराजी व्यक्त केली. मात्र, मुख्यमंत्र्यांनी शिष्टाई केल्यानंतर रवी भेगडे यांची उमेदवारी मागे घेण्यात आली. शेळके यांनी मात्र भेगडे यांच्यापुढे आव्हान उभे केले आहे. उमेदवारीवरून भाजपप्रमाणेच राष्ट्रवादीतही नाराजी नाटय़ उफाळले. शेळके यांना उमेदवारी दिल्यानंतर इतरांनी पवारांचा आदेश मानून प्रचाराला सुरुवात केली. मात्र, राष्ट्रवादीचे नेते आणि पवारांचे निकटवर्तीय बाळासाहेब नेवाळे नाराज झाले. इतकी वर्षे राष्ट्रवादीत निष्ठेने काम केले, त्याची किंमत पक्षाने ठेवली नाही. ज्यांनी कायम राष्ट्रवादीला विरोध केला, त्यांनाच पक्षाने उमेदवारी दिल्याच्या निषेधार्थ नेवाळे यांनी पक्षत्याग केला.
या वेळी विजयाची शक्यता दिसू लागल्याने राष्ट्रवादीत उत्साह असून शरद पवार आणि अजित पवारांनी वैयक्तिक लक्ष घातले आहे. दुसरीकडे, बाळा भेगडे यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ताकद लावली आहे.