पुणे रेल्वे स्थानकावर कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की

पुणे-दौंड लोकलच्या उद्घाटनाच्या सोहळ्यात शनिवारी पुणे रेल्वे स्थानकावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राजकीय राडा घातला. खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकाराने डेमू गाडीवर राष्ट्रवादीचे फलक लावण्यात आले होते, तर भाजपचे कार्यकर्ते गळ्यामध्ये पक्षाचे उपरणे घालून व्यासपीठावर असल्याने दोन्हीकडून याबाबत अक्षेप घेत जोरदार बाचाबाची आणि धक्काबुक्कीही झाली.

मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील पुणे-दौंड डेमूसह विविध प्रकल्पांचे उद्घाटन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कोल्हापूर येथून व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे केले. डेमूच्या उद्घाटनासाठी पुणे स्थानकावरही लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी डेमू गाडीच्या पुढील भागात व प्रत्येक डब्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचा काँग्रेस पक्षाचा उल्लेख आणि शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांचे छायाचित्र असलेले फलक लावले होते. सुप्रिया सुळे कार्यक्रमस्थळी असल्याने रेल्वेच्या अधिकाऱ्यांनीही या प्रकाराला आक्षेप घेतला नाही.

कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी भाजपचे काही कार्यकर्ते पक्षाचे उपारणे घालून व्यासपीठावर आले. हा पक्षाचा कार्यक्रम नसल्याचे सांगत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्याला आक्षेप घेतल्यानंतर गाडीवर राष्ट्रवादीकडून लावण्यात आलेल्या फलकांबाबतही जोरदार अक्षेप घेण्यात आला. त्यातून वादाची ठिणगी पडली आणि दोन्हींकडून जोरदार बाचाबाची सुरू झाली.

पक्षाची घोषणाबाजी सुरू झाल्याने वाद वाढतच गेला. प्रचंड गोंगाटात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच प्रकरण थेट धक्काबुक्कीवर पोहोचले. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. शेवटी पोलिसांचा हस्तक्षेप आणि लोकप्रतिनिधींनी कार्यकर्त्यांची समजूत घालून सर्वाना शांत केल्याने वातावरण निवळले.

दौंडकरांची चाळीस वर्षांची प्रतीक्षा संपली

पुणे-दौंड डेमू लोकलचे उद्घाटन झाल्यामुळे दौंडकरांची मागणी चाळीस वर्षांची प्रतीक्षा पूर्ण झाली आहे. सध्या या गाडीच्या फेऱ्या कमी असल्याने त्या वाढविण्याची मागणी करण्यात येत आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते कोल्हापूरहून या सेवेसह पुणे-दौंड विद्युतीकरण, पुणे स्थानकावरील मोफत वाय-फाय सुविधा, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. पुणे स्थानकावरील कार्यक्रमासाठी महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, सुप्रिया सुळे, अमर साबळे, पुणे रेल्वे स्थानक व्यवस्थापक गुरुराज सोनी, रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षां शहा, दौंड-पुणे प्रवासी संघाचे विकास देशपांडे, पर्सिस्टंटच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आरती दंडवते आदी उपस्थित होते.