महाराष्ट्र कनेक्ट कॉन्क्लेव्ह अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांची ज्ञानेश महाराव यांनी आज(शनिवार) पुण्यात मुलाखत घेतली. यावेळी विविध मुद्य्यावरून या नेत्यांना प्रश्न विचारले गेले, ज्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.

शिवसेना नेते संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला की, तुमचा अडीच वर्षांचा जो आग्रह होतो तो जर भाजपाने मान्य केला असता, तर एवढ्या अडीच वर्ष संपली असती. आता तुमची पुढील अडीच वर्षे सुरू झाली आहेत, असा कसं वाटतं आहे? यावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, “अडीच वर्षांपूर्वी साधारण आमची जी देवाणघेवाण सुरू होती. तेव्हाच माझ्या डोक्यात सुरू होतं की हे काही शब्दाला जागणारे लोक नाहीत. मी शरद पवारांशी नेहमी संपर्कात असतो, त्यांना म्हणालो की काहीतरी बदल महाराष्ट्रात व्हायला हवा. महाराष्ट्रात बदल करण्याचं सामर्थ जर कोणामध्ये असेल तर ते शरद पवार यांच्यात आहे. या गोष्टी निकालाच्या अगोदरच्या मी सांगतोय,याचा अर्थ भाजपाला आम्ही फसवायला निघालो होतो असं नाही. परंतु त्यांची जी वृत्ती होती, याचा मी एक फार मोठा अभ्यासक आहे. त्यामुळे मला माहीत आहे की हे काय करू शकतात, हे काय करणार हे मी आताही सांगू शकतो. दिलेला शब्द पाळला नाही म्हणून शिवसेना देखील या महाराष्ट्रात एक वेगळी भूमिका घेऊ शकते आणि शिवसेनेसोबत इतर प्रमुख पक्ष येऊन या राज्याला एक वेगळी दिशा आणि नेतृत्व देऊ शकतात, हे जेव्हा दाखवण्याची संधी आली. तेव्हा मला असं वाटतं की सगळ्या प्रमुख नेत्यांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला. ”

तसेच, “मला अजूनही खात्री वाटते की महाराष्ट्रातील हा प्रयोग हा असाच सुरु राहीला, तर देशामध्ये देखील बदल घडवण्याची ताकद आपल्या राज्यात आहे. मागील अडीच वर्षांत महाराष्ट्रात अनेक राजकीय संकटं विविध माध्यमातून निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. पण कोणी वाकलं किंवा झुकलं नाही. आपण लढतो आहोत, हा लढणारा महाराष्ट्र आहे. त्यामुळे पुढील अडीच वर्षे देखील सुखरुप पार पडतील आणि त्या नंतरच्या निवडणुकांमध्ये देखील भाजपाने विरोधी पक्षात बसण्याची मानसिक तयारी ठेवावी, हे मी खात्रीने सांगतो.” असंही संजय राऊत यांनी बोलून दाखवलं.