राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि वंदना चव्हाण एकीकडे ग्रामस्थांच्या आंदोलनात सहभागी होतात आणि दुसरीकडे शहरात येऊन कचरा उचलला जावा, यासाठी आंदोलन करतात. दोन्ही खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा कचरा प्रश्नी असा दुटप्पीपणा सुरु आहे, असा थेट आरोप राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी शनिवारी केला. तर, शिवतारे यांना कचरा प्रश्न समजलेलाच नाही. महापालिका प्रशासनाबरोबरच सत्ताधाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष न घातल्याने प्रश्न चिघळला आहे. कचरा प्रश्नी भाजप जबाबदारी झटकत आहे, असा आरोप खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी केला. दरम्यान, ग्रामस्थांबरोबरची चर्चा निष्फळ ठरल्यामुळे या प्रश्नाबाबत कोणताही तोडगा निघू शकला नाही. शिवतारे यांच्या बैठकीवर ग्रामस्थांनी बहिष्कार घातला होता.

विधानभवन येथे कचराप्रश्नाच्या सद्य:स्थितीवर राज्यमंत्री शिवतारे यांनी बैठक घेऊन आढावा घेतला. जिल्हाधिकारी सौरभ राव, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, उपमहापौर नवनाथ कांबळे, सभागृहनेता श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे महापालिकेतील गटनेता चेतन तुपे यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना शिवतारे म्हणाले,की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार मी आज ग्रामस्थांशी चर्चेसाठी गेलो होतो. गेल्या एकवीस दिवसांपासून कचराप्रश्नी आंदोलन सुरु आहे. ग्रामस्थांशी सकारात्मक चर्चा झाली. परंतु, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि वंदना चव्हाण ग्रामस्थांच्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. आंदोलकांना या दोन्ही खासदारांची फूस आहे, हे उघड आहे. त्यामुळे कचरा प्रश्नी पक्षीय राजकारण बाजूला ठेवा. अन्यथा राजकारण करुन वेठीस धरणाऱ्यांना पुणेकर धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत.

‘महापालिकेच्यावतीने कचराप्रश्न सोडविण्यासाठी ग्रामस्थांशी सकारात्मक चर्चा सुरु आहे. शहरात सव्वीस कचरा प्रकल्प सुरु करण्यात येत आहेत’, असे भिमाले यांनी सांगितले.

शिवतारे यांनी कचरा प्रश्नात चर्चा केल्यावरुन लक्षात येते, की त्यांना कचरा प्रश्न समजलाच नाही, अशी टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष, खासदार वंदना चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली. कचऱ्याचे किती प्रकल्प सुरु आहेत, लेखापरीक्षण केले आहे किंवा नाही, प्रकल्पांची क्षमता आणि प्रत्यक्षात किती कचऱ्यावर प्रक्रिया होते, शंभर टक्के का चालत नाहीत, याची माहिती प्रशासन घेत नाही. तीन महिन्यांनी लेखापरीक्षण होणे आवश्यक असताना ते झाले नाही, त्यामुळेच आजची परिस्थिती ओढवली आहे. गेल्या दहा वर्षांत विकेंद्रित पद्धतीचे प्रकल्प तयार झाले असून ते चालण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले गेलेले नाहीत, असेही त्या म्हणाल्या.

आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा

कचरा डेपो हटविण्यासाठी फुरसुंगी आणि उरुळी देवाची ग्रामस्थांचे आंदोलन सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी (७ मे) खासगी कार्यक्रमासाठी पुण्यात येणार आहेत. या वेळी कचरा प्रश्नावर लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांच्या शिष्टमंडळासह बैठक घेऊन सकारात्मक तोडगा काढला जाईल. महापालिकेच्यावतीने पंधरा दिवसांमध्ये कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यामध्ये शहरातील सर्व प्रभागांमधील छोटय़ा क्षमतेचे बंद पडलेले प्रक्रिया प्रकल्प सुरु करणे, पिंपरी सांडस येथील जागा, प्रकल्प उभारणी, ग्रामस्थांची मागणी याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा होईल, अशी माहिती राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिली.