परवा वैशाखवणव्याच्या चांदण्यात कामानिमित्त पानशेतजवळ गेलो होतो. कामातून मोकळा झाल्यावर दुचाकीवर एकटाच भटकत होतो. सांगरुण गावजवळ एक काका रस्त्याच्या कडेला टोपलीत भाजी ठेवून बसलेले दिसले. अशा लोकांना भेटायला, त्यांच्या गप्पा ऐकायला का माहिती नाही पण मला प्रचंड आवडतं! जन्मापासून शहरात राहत असलो, तरी कुठेतरी गावच्या मातीशी नाळ जोडली राहिल्याची भावना मनात राहते.
भाजी खरेदीच्या निमित्तानी जरा त्यांच्यापाशी थांबलो. ते आधी फार काही बोलत नव्हते. काय माहिती? ह्या गाववाल्यांचे असतील काही अनुभव! त्यातून निर्माण झालेले खरेखोटे ग्रह, त्या झालेल्या समजाला संपूर्ण चूक म्हणताही येत नाही. पण अशा लोकांना शहरी लोकांचा चांगुलपणा दाखवायची संधीही मी सोडत नाही. तरी ते फार बोलत नसल्याने मीही बोलायचा विशेष आग्रह न धरता, घरच्यासाठी गाडीच्या डिक्कीत ठेवता आली तेवढी भाजी खरेदी केली. पैसे देताना कुठलीही घासाघिस न केल्यानेही असेल कदाचित पण काकांचा आवाज बाहेर पडला.
‘पाव्हनं कुठलं?’ मी पुण्याचाच आहे म्हणालो. मग त्यांची चौकशी केल्यावर गप्पांना सुरुवात झाली. काकांच आडनाव पायगुडे, शेती करतात(वय ६०+) आणि उरलेल्या वेळात टोपलं टाकून इथे भाज्या विकतात. म्हटले ‘उन्हाळा आहे तोवर हे काम असतं दादा, पावसाळ्यात लावणी झाली की हातावर हात धरुन बसावं लागतं. पूर्वी ठिक होतं, फक्त शेती असेल तर जगता यायचं, आता गरजा वाढल्या आहेत.’
त्यासाठी काम करायला रोज पुण्याला येण्याची तयारी आहे. कुठे काम मिळेल का वॉचमनच वगैरे? मी शंकेनी विचारलं, “काका, परवडणार का तुम्हाला रोज यायला?” (आजकाल प्रत्येक नोकरी मागणाऱ्याचं हे परवडायचं खूप असतं) तर म्हणाले, “अर्र दादा, हिथनं एसटी असती, जेष्ठ नागरिकाचा पास भेटतो. जातायेता झोप होती. मग का नाय काम करायचं? रिकामं राहण्यापेक्षा काम करत राहणं माणसाला लई परवडतं बघ.” आम्ही दोघंही हसलो. काका दोन मिनिटांत अहो जाओ वरून अरे तुरेवर आले होते. ‘येकदम घरच्यावानी’.
बघतो कुठे गरज लागली तर सांगतो, असं म्हणून फोन नंबरची देवाणघेवाण करून निघालो. तेवढ्यात ३-४ दुचाक्यांवर ८-१० वीर मागून येणाऱ्यांसाठी, तोंडातल्या ‘विमल’च्या पायघड्या डांबरी रस्त्यावर पसरत, आम्हा दोघांकडे धावते कटाक्ष टाकत निघून गेले. या लोकांना हे असं मोकाट फिरणं कसं परवडतं, असा विचार करत मीही निघालो.
बाकी, ही खेड्यातली माणसं जाताजाता काय शिकवतील ह्याचा नेम नाही. मगाशीच म्हणालो ना? अशा लोकांना भेटायला, त्यांच्या गप्पा ऐकायला मला प्रचंड आवडतं, ते उगीचच नाही…
– अंबर कर्वे, पुणे</strong>