शहरातील बोगस डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने सुरू केलेल्या डॉक्टरांच्या सर्वेक्षणाला गती येण्याची शक्यता आहे. हे सर्वेक्षण करण्यासाठी नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये सोमवारपासून वाढ करण्यात आली आहे.
जानेवारीपासून पालिकेने बोगस डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी डॉक्टरांची सर्वेक्षण मोहीम सुरू केली होती. मात्र हे काम करण्यासाठी प्रत्येक झोनला एक असे एकूण चारच कर्मचारी होते. मात्र सोमवारपासून पालिकेने पूर्वी अन्न निरीक्षक म्हणून काम करणाऱ्या सहा कर्मचाऱ्यांनाही या मोहिमेत सामावून घेतले आहे. त्यामुळे आता प्रत्येक झोनमध्ये किमान दोन कर्मचारी सर्वेक्षण करू शकतील. सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी ही माहिती दिली.
डॉक्टरांच्या सर्वेक्षणात सध्या झोपडपट्टय़ा आणि खराडी, सिंहगड रस्ता, सातारा रस्ता, नगर रस्ता अशा शहराच्या बाहेरील भागांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. वावरे म्हणाले, ‘‘झोपडपट्टय़ांमधील सर्वेक्षणाचे काम ७५ टक्के पूर्ण झाले आहे. अजून आम्ही उच्चभ्रू भागात सर्वेक्षण सुरू केले नसले, तरी या भागातून बोगस डॉक्टरांच्या तक्रारी आल्यास त्या प्राधान्याने हाताळत आहोत. यापूर्वी डेक्कन आणि सदाशिव पेठेत बोगस डॉक्टरांची प्रकरणे घडली आहेत.’’
पालिकेचे कर्मचारी वस्त्यांमध्ये फिरून वैद्यकीय व्यावसायिकांचा नोंदणी क्रमांक आणि त्यांचे पदवी प्रमाणपत्र तपासून त्याची झेरॉक्स कॉपी घेत आहेत. तसेच डॉक्टरांनी संबंधित वैद्यक परिषदेकडे केलेल्या नोंदणीचे प्रमाणपत्र दवाखान्याच्या दर्शनी भागात लावले आहे का, हे देखील तपासले जात आहे.
संग्रहित लेख, दिनांक 29th May 2014 रोजी प्रकाशित
पुण्यातील बोगस डॉक्टरांच्या शोधाला गती येणार
डॉक्टरांच्या सर्वेक्षणात सध्या झोपडपट्टय़ा आणि खराडी, सिंहगड रस्ता, सातारा रस्ता, नगर रस्ता अशा शहराच्या बाहेरील भागांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

First published on: 29-05-2014 at 02:50 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bogus doctor pmc checking