आपल्या अनोख्या शब्दकळेने रसिकांवर काव्याचे गारुड निर्माण करणारे प्रतिभावंत.. ‘आय एम फ्री बट नॉट अॅव्हलेबल’ अशी दारावर पाटी लावून एकांताचा आनंद लुटणारे.. प्रा. माणिक गोडघाटे ऊर्फ ज्येष्ठ कवी ग्रेस यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू ‘संगमरवरी स्वप्नांचा शिलेदार’ या पुस्तकातून उलगडणार आहेत. प्रतिभासंपन्न कवी, सर्जनशील ललित लेखक आणि एक कलंदर व्यक्ती म्हणून त्यांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या विविध मान्यवरांच्या लेखांचा समावेश हे या पुस्तकाचे अनोखे वैशिष्टय़ आहे.
‘ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता’, ‘तुला पाहिले मी नदीच्या किनारी’, ‘भय इथले संपत नाही’, ‘वाऱ्याने हलते रान’, ‘कंठात दिशांचे हार’, ‘घर थकलेले संन्यासी’ अशा कवितांनी रसिकांच्या मनात घर करून राहिलेले ग्रेस यांचा रविवारी (२६ मार्च) पाचवा स्मृतिदिन. ग्रेस यांच्या कवितांनी भुरळ पाडली अशा मान्यवरांच्या लेखांचा समावेश असलेले ‘संगमरवरी स्वप्नांचा शिलेदार : ग्रेस’ हे पुस्तक संस्कृती प्रकाशनतर्फे लवकरच वाचकांच्या भेटीला येत आहे.




ज्येष्ठ कवी वसंत आबाजी डहाके, वसंत केशव पाटील, अरुण म्हात्रे, डॉ. अरुणा ढेरे, डॉ. समीर कुलकर्णी, ग्रेस यांच्या कवितांवर ‘साजण वेळा’ कार्यक्रम करणारे संगीतकार आनंद मोडक, मिथिलेश पाटणकर, प्रसिद्ध चित्रकार रविमुकुल, प्रा. मििलद जोशी, विश्वास वसेकर, प्रसाद मणेरीकर, डॉ. तीर्थराज कापगते यांनी ग्रेस यांच्या व्यक्तित्वावर प्रकाशझोत टाकणारे लेख लिहिले आहेत. ग्रेस यांच्यासमवेत शब्दसुरांची मैफल रंगविणारे ज्येष्ठ संगीतकार-गायक पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी लेखन करावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ग्रेस यांच्या कवितांचे रसिक असलेले साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांची प्रस्तावना असेल. तर या पुस्तकाचे मुखपृष्ठ रविमुकुल करणार आहेत, अशी माहिती संस्कृती प्रकाशनच्या सुनीताराजे पवार यांनी दिली.