पुणे : युरोपातील साहित्य आणि संस्कृतीची कवाडे पुणेकरांना खुली करून देणारी ब्रिटिश कौन्सिल लायब्ररी उद्या साठाव्या वर्षांत पदार्पण करीत असून त्यानिमित्ताने नव्या पिढीत वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
पुण्यामध्ये फग्र्युसन रस्त्यावर २९ सप्टेंबर १९६० रोजी ब्रिटिश लायब्ररीची स्थापना करण्यात आली. रविवारी (२९ सप्टेंबर) साठाव्या वर्षांत पदार्पण करणाऱ्या ब्रिटिश लायब्ररीचा इंग्रजी पुस्तकांचा वाचकवर्ग वाढविण्यात मोठा वाटा आहे. आता ब्रिटिश लायब्ररी शिवाजीनगर येथील रामसुख हाउस येथील प्रशस्त जागेमध्ये स्थलांतरित झाली आहे. लायब्ररीच्या हीरकमहोत्सवी वर्षांची सुरुवात ऑगस्टमध्ये महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते करण्यात आली होती. पुण्यातील अधिकाधिक पालक आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी लायब्ररीतर्फे गेल्या दोन वर्षांपासून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
ब्रिटिश लायब्ररी अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सभासदत्वाच्या विविध पर्यायामुळे वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. पुण्यातील समस्या, महिनाभरातील चर्चेतील विषयांबद्दल जागृती करण्यासाठी आम्ही ‘व्हॉट्स अॅप पुणे‘ ही व्याख्यानमाला सुरू केली आहे. त्यासाठी दर महिन्याला आम्ही विविध क्षेत्रातील मान्यवरांना व्याख्यानासाठी निमंत्रण देतो. हा कार्यक्रम सर्वासाठी खुला असतो. या शिवाय वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठीही विविध उपक्रम राबविण्यात येतात, असे ब्रिटिश लायब्ररीच्या पुण्यातील प्रमुख गुंजन नरूला यांनी सांगितले.
होणार काय?
लायब्ररीतर्फे ‘रिडिंग एजन्सी युके’ या संस्थेच्या सहकार्याने प्रतिष्ठित मानली जाणारी रिडिंग चॅलेंज स्पर्धा भारतात घेण्यात येणार असून, त्याची सुरुवात पुण्यापासून होणार आहे, अशी माहिती ब्रिटिश लायब्ररीच्या पुण्यातील प्रमुख गुंजन नरूला यांनी दिली.
सदस्यसंख्या वाढती..
पूर्वी ब्रिटिश लायब्ररीत सदस्य म्हणून नोंदणी करण्यासाठी वाचकांना प्रतीक्षा यादीच्या प्रक्रियेतून जावे लागत असे. मात्र, आता नोंदणीप्रक्रिया सुलभ झाल्याने सदस्यांची संख्या वाढत आहे. मुलांना, पालकांना केंद्रस्थानी ठेवून विविध उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत.