नगर रस्ता आणि आळंदी रस्त्यावर बीआरटी सुरू करण्यासाठी देण्यात आलेली मुदत संपली असून अनेक कामे बाकी असल्यामुळे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी या दोन मार्गावरील बीआरटी सुरू होणार नसल्याचेही चित्र आहे.
केंद्र व राज्याकडून मिळालेल्या अनुदानातून पुण्यात बीआरटी प्रकल्प राबवला जात असून कात्रज ते हडपसर या मार्गावर गेली सात वर्षे प्रायोगिक तत्त्वावरील बीआरटी सुरू आहे. या मार्गावरील बीआरटीच्या त्रुटी अद्यापही दूर झालेल्या नाहीत. त्या पाठोपाठ आता आणखी दोन मार्गावर बीआरटी सुरू करण्याचे नियोजन आहे. मात्र, नगर रस्ता आणि आळंदी रस्ता या नियोजित दोन्ही मार्गावरील बीआरटी प्रकल्पाची कामे अद्यापही बाकी आहेत. ही कामे १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण केली जातील असे सांगितले जात होते. प्रत्यक्षात मात्र कामे पूर्ण होण्याची शक्यता नाही.
नगर रस्ता आणि आळंदी रस्ता या दोन्ही रस्त्यांवरील बीआरटी मार्गावर जे बसथांबे उभारण्यात आले आहेत त्यांना स्वयंचलित दरवाजे बसवण्याचे काम बाकी आहे. अनेक थांब्यांवरील हे काम अपूर्ण असून जिथे काम अर्धवट झाले आहे तेथील काचा फोडून नासधूस करण्यात आली आहे. त्या बरोबरच गाडय़ांचे जे दरवाजे आहेत त्या उंचीच्या समपातळीत बसथांबे आणण्यासह अन्यही अनेक कामे बाकी आहेत. काही स्वयंसेवी संस्थांनी देखील या मार्गावर असलेल्या त्रुटीचा अहवाल महापालिकेला सादर केला होता. त्या अहवालातूनही अनेक उणिवा दाखवून देण्यात आल्या होत्या. त्याबाबतही अद्याप कार्यवाही झालेली नाही.
या दोन्ही मार्गावर जे बसथांबे आहेत तेथील स्वयंचलित दरवाजांची कामे पूर्ण झाली असती, तर या महिन्यात बीआरटी सुरू करता आली असती. मात्र, तूर्त हे काम केव्हा पूर्ण होईल या बाबत अनिश्चितता आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी या मार्गावर बीआरटी सुरू होईल किंवा कसे असा प्रश्न आहे.