पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील तीन मार्गावर पीएमपीच्या वतीने बीआरटी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. या मार्गावर वाहतूक वॉर्डन नेमलेले असतानाही बीआरटी मार्गातून खासगी वाहनांची वाहतूक सर्रास होत आहे. प्रशासनाकडून त्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. कारवाईच्या मुद्दय़ावर महापालिका आणि पोलीस प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवत असल्याने खासगी वाहन चालकांकडून बीआरटी मार्गाचा बेकायदा वापर केला जात आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने पिंपरी-चिंचवड शहरामध्ये चार ठिकाणी बीआरटी मार्ग तयार केले आहेत. त्यात दापोडी ते निगडी, सांगवी ते किवळे, काळेवाडी फाटा ते देहु आळंदी रस्ता आणि नाशिक फाटा ते पिंपळे सौदागर या चार मार्गाचा समावेश आहे. त्यातील तीन मार्गावर सध्या बीआरटी सुविधा सुरु करण्यात आली आहे. काळेवाडी फाटा ते देहु आळंदी रस्ता या मार्गावरील बीआरटी मार्गाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. परंतु चिंचवड  येथील अ‍ॅटो क्लस्टरजवळील एमआयडीसीमधील काही कंपन्या बीआरटी मार्गामध्ये येतात. तेथील जागा ताब्यात घेण्याबाबत निर्णय न झाल्यामुळे हा बीआरटी मार्ग पूर्णत्वास गेलेला नाही.

काळेवाडी फाटा ते देहु आळंदी रस्ता हा मार्ग सोडला तर इतर तीन मार्गावर बीआरटीची सुविधा सुरु आहे. परंतु सध्या सुरु असलेल्या बीआरटी मार्गातून पीएमपीच्या गाडय़ा ये-जा करत असल्या तरी या सुविधेत अनेक त्रुटी आहेत. बीआरटी मार्गातून खासगी वाहनांची वाहतूक होऊ नये यासाठी प्रत्येक चौकामध्ये वाहतूक वॉर्डन नेमण्यात आले आहेत. तरीही बीआरटी मार्गातून सर्रास खासगी वाहतूक सुरू असते. वाहन चालकांकडून बीआरटी मार्गाचा वापर केला जातो. त्यामुळे बीआरटीच्या सुविधेत अडचणी निर्माण होत आहेत.  या वाहन चालकांवर कारवाई करण्याचा अधिकार आमच्याकडे नाही असे कारण महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येते. तर पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी मनुष्यबळाची समस्या सांगून बीआरटी मार्गातून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांची नावे दिली तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करु, अशी प्रतिक्रिया दिली आहे. महापालिका आणि पोलीस प्रशासन यांच्यामधील विसंवादामुळे बीआरटी मार्गाचा केवळ देखावा होत असल्याचे चित्र या मार्गावर आहे.