हडपसरमधील महादेवनगर येथील बांधकाम साईटवर काम करताना एका कामगाराचा सातव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कोणत्याही उपाययोजना न केल्यामुळे या कामगाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून व्यंकटेश्वरा अॅन्ड असोसिएट्सच्या मालकास हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.
जयंतू दिजन बर्मन (वय २२, रा. पश्चिम बंगाल) या कामगाराचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी व्यंकटेश हनुमंत राजुरे (वय ३२, रा. सनश्री कंगन, कोंढवा) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यंकटेश्वरा अॅन्ड असोसिएट्सची हडपसर येथील महादेवनगर येथे सेरिनीटी साईटच्या वन एक या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीच्या सातव्या मजल्यावर सेंट्रींगचे काम करत असताना शुक्रवारी बर्मन तोल जाऊन खाली पडला. यामध्ये त्याच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी बर्मन याचा मामा बप्पादित्य जितेन रॉय (वय ३२, रा. नवी मुंबई) यांनी तक्रार दिली आहे. व्यंकटेश्वरा अॅन्ड असोसिएट्सने या बांधकाम साईटवर कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हेल्मेट, सुरक्षित जाळी याची कोणतीही काळजी घेतली नव्हती. कामगारांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत हलगर्जी व निष्काळजीपणा केल्यामुळे बर्मन याचा मृत्यू झाला. या प्रकरणी राजुरे याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक लोणारे हे अधिक तपास करत आहेत.