पुण्यातील कोंढवा भागात भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला. या घटनेत महिला आणि दोन लहान मुलांचाही समावेश आहे. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. घटनास्थळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी भेट दिली. प्रथमदर्शनी या सगळ्या प्रकारात बिल्डर आणि कंत्राटदारांचा निष्काळजीपणा भोवल्याचं दिसतं आहे. या घटनेची संपूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई करू असं आश्वासन नवल किशोर राम यांनी म्हटलं आहे. मृत मजूर हे बिहार आणि बंगालमधून आल्याचं सांगितलं जातं आहे. पुण्यात गुरूवार आणि शुक्रवार हे दोन्ही दिवस पाऊस सुरू आहे. त्यामुळे इमारतीजवळची भुसभुशित झाली आणि त्यामुळे संरक्षक भिंत कोसळली.

प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या सगळ्या दुर्घटनेत एकूण १५ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. रात्री १ वाजून ५३ मिनिटांपासून बचाव कार्य सुरू करण्यात आलं होतं. हे बचावकार्य सध्या थांबवण्यात आलं आहे. वॉल कपाऊंड कोसळल्याने काही कारही या ढिगाऱ्याजवळ लटकल्या आहेत. हा सगळा ढिगारा आणि कार बाहेर काढण्यासाठी क्रेन बोलावली जाणार आहे. त्यानंतर बचावकार्य सुरू होईल. इमारतीच्या कपाऊंडची भिंत बांधतांना बांधकाम व्यावसायिकाने निष्काळजीपणा केला आहे असा आरोप स्थानिकांकडून होतो आहे.