पुणे : भारत देश आज जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे.कारण आपल्या देशाचा विकासाचा वेग वाढला आहे, यामध्ये मोठ्या प्रकल्पांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. आपल्याकडे इंग्रजांनी बांधलेल्या वास्तू, पूल आजही अनेक ठिकाणी सुस्थितीत असल्याचे दिसते मात्र आपण चाळीस वर्षांपूर्वी केलेल्या कामाचे पुनर्निर्माण करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे हे का होत आहे याचा विचार करण्याची गरज आहे.
आज पर्यावरणपूरक शाश्वत विकास आणि आपत्ती रोधक बांधकामे काळाची गरज असल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या सभागृहात प्रोफेशनल स्ट्रक्चरल इंजिनिअर्स असोसिएशन या संस्थेचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष शेषराव कदम, सचिव अजय कदम, कोषाध्यक्ष अजय ताम्हणकर, नारायण कोचक, अशोक मोरे, विरेद्र चव्हाण, नितीन लाळे, अंशुमन भिडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अजित पवार म्हणाले, स्ट्रक्चरल इंजिनिअर्स चे काम अतिशय महत्त्वपूर्ण आहे.संस्थेची स्थापना फार पूर्वी होणे गरजेचे होते. एखादा पूल किंवा इमारत कोसळली की,आपल्याला स्ट्रक्चरल ऑडिट आठवते मात्र बांधकाम सुरू करण्यासाठी त्यांचे योगदान महत्वाचे असते.त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.पूर्वीची बांधकामे मजबूत होती आजही आपण त्याच धर्तीवर काम करत आहोत,मात्र त्यात बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे, या सोबतच ते काम दीर्घकाळ टिकणारे असावे याची खात्री करणे गरजेचे आहे.
एकूण स्ट्रक्चरल इंजिनिअर फार कमी आहेत त्यातही नवीन पिढी या क्षेत्रात येत नसेल तर नियमांत काय बदल करणे आवश्यक आहे ते सांगा, म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी चर्चा करून मार्ग काढता येईल,असे त्यांनी सांगितले.