scorecardresearch

घरफोडीचे गुन्हे वाढीस; गुन्हे उघड होण्याचे प्रमाणही जेमतेमच

शहरात  घरफोडी करणाऱ्या चोरटय़ांनी धुमाकूळ घातला आहे. दिवसाढवळय़ा सोसायटीत शिरून चोरटे सदनिका फोडून लाखो रुपयांचा ऐवज लांबवित असून त्यातुलनेत चोरटयमंना पकडण्याचे प्रमाण कमी आहे.

पुण्यात दररोज दोन घरफोडय़ा

पुणे : शहरात  घरफोडी करणाऱ्या चोरटय़ांनी धुमाकूळ घातला आहे. दिवसाढवळय़ा सोसायटीत शिरून चोरटे सदनिका फोडून लाखो रुपयांचा ऐवज लांबवित असून त्यातुलनेत चोरटयमंना पकडण्याचे प्रमाण कमी आहे. गेल्या वर्षी  शहरात ४४७ गुन्हे घडले असून त्यापैकी २११ गुन्ह्यांमधील आरोपींना पकडण्यात आले आहे. शहरात दिवसाला एक ते दोन घरफोडीचे प्रकार घडत असून घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याची पोलिसांची कामगिरी जेमतेमच असल्याचे आकडेवारीवरून उघड झाले आहे.

शहरातील मध्यभागाच्या तुलनेत उपनगरात घरफोडयमंचे प्रमाण जास्त आहे. गेल्या काही दिवसांपासून भरदिवसा सदनिका फोडून ऐवज लांबविण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. वारजे, कोथरूड, बाणेर, औंध, धनकवडी, कात्रज, कोंढवा, हडपसर या उपनगरात घरफोडीचे गुन्हे घडण्याचे प्रमाण जास्त आहे. सोसायटीच्या आवारात सुरक्षारक्षक आणि सीसीटीव्ही कॅमेरे असताना चोरटे अगदी सहज सोसायटीत प्रवेश करतात. नागरिकांनी पै-पै करून जमावलेला लाखो रुपयांचा ऐवज लांबवून चोरटे पसार होत असून चोरटय़ांना पकडण्यात पोलिसांना अपयश आले आहे. बंद सदनिकांची पाहणी करून कुलूप उचकटून चोऱ्या करतात.  सोसायटीच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, सुरक्षारक्षक ठेवावा तसेच अनोळखी व्यक्तीला शक्यतो सोसायटीत प्रवेश देऊ नये, अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. 

दुर्लक्ष चोरटय़ांच्या पथ्यावर

 शहरातील अनेक सोसायटय़ांमध्ये सुरक्षारक्षक देखील नाहीत. सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने चोरटय़ांचे फावते. तकलादू कडी कोयंडे चोरटय़ांच्या पथ्यावर पडले आहेत. कटावणीच्या एका फटक्यात कडी कोयंडे तुटतात. त्यामुळे सदनिकेच्या दरवाज्यांना चांगल्या दर्जाच्या पोलादापासून तयार करण्यात आलेले  कुलूप, कडी, कोयंडे चांगल्या दर्जाचे असणे गरजेचे आहे, असे निरीक्षण गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी नोंदविले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Burglary rise crime rate same ysh

ताज्या बातम्या