पुणे : आता गणपतीपासून सणासुदीचा काळ सुरू होत आहे. त्यापुढे नवरात्र, दिवाळी आणि नाताळ अशा सणांमुळे सुट्या येतात. या काळात प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असते. सध्या ऑनलाइन माध्यमातून घरबसल्या रेल्वेसह विमानाची तिकिटे आरक्षित केली जातात. याचाच फायदा घेऊन सायबर गुन्हेगारांकडून बोगस संकेतस्थळे अथवा सहलीची पॅकेज अशा नवनवीन क्लृप्त्या वापरून फसवणूक करण्याचा धोका वाढला आहे, असा इशारा क्विक हील टेक्नॉलॉजीजच्या ताज्या अहवालात देण्यात आला आहे.
सणासुदीच्या काळात प्रवासासाठी ऑनलाइन तिकिटे आरक्षित करण्यासह ऑनलाइन खरेदीवर भर दिला जातो. सायबर गुन्हेगारांकडून या कालावधीत बोगस संकेतस्थळे तयार केली जातात. रेल्वे अथवा विमानसेवेच्या तिकिटांचे आरक्षण होणाऱ्या संकेतस्थळांसारखी ही हुबेहूब दिसतात. पुरेशी खातरजमा न करता नागरिक त्यावर आपली खासगी माहिती आणि देयक तपशील देतात. सायबर गुन्हेगारांनी खात्यातून पैसे काढून घेतल्यानंतर नागरिकांना फसवणुकीची जाणीव होते. त्यामुळे आपण कोणत्या संकेतस्थळावरून तिकिटे आरक्षित करीत आहोत अथवा खरेदी करीत आहोत, याची आधी खातरजमा करणे आवश्यक आहे, असे क्विक हीलच्या अहवालात म्हटले आहे.
लिंकवर क्लिक करण्याआधी…
दांडियाच्या कार्यक्रमासह इतर सांस्कृतिक कार्यक्रमांची ऑनलाइन तिकिटे आरक्षित केली जातात. सायबर गुन्हेगार बोगस संकेतस्थळे तयार करून त्यावरून यूपीआय देयकाची लिंक नागरिकांना पाठवितात. या लिंकवर क्लिक केल्यानंतर ग्राहकाच्या खात्यातून पैसे गायब होतात. बोगस संकेतस्थळांवर मोठ्या प्रमाणात सवलतीचे आमिष दाखविले जाते. त्यामुळे ग्राहक या आमिषाला बळी पडतात. या संकेतस्थळामध्ये मालवेअर असतो. तो तुमची सर्व आर्थिक माहिती गोळा करतो. त्यातून आर्थिक फसवूणक होण्याचा धोका निर्माण होतो.
झटपट कर्जाचा मोह
सध्या झटपट कर्ज देणारी अनेक ॲप उपलब्ध आहेत. या ॲपबद्दल नागरिकांना पुरेशी माहिती नसते. मोबाइलमध्ये ही ॲप डाऊनलोड केल्यानंतर ती अनेक परवानग्या मागतात. मोबाइलमधील संपर्क क्रमांकाची परवानगी दिल्यानंतर या ॲपच्या माध्यमातून सर्वांना संदेश पाठवून पैसे उकळण्याचे काम केले जाते. अनेक वेळा रेल्वे स्थानके, विमानतळे, कॅफे यांसारख्या सार्वजनिक ठिकाणच्या वाय-फायचा वापरही धोकादायक ठरतो. तिथे आपण करणाऱ्या व्यवहारांवर सायबर गुन्हेगारांचे वाय-फाय नेटवर्कमधून लक्ष असते. त्या माध्यमातून आपल्या खात्यातून व्यवहार केले जातात.
काळजी काय घ्यावी…
- संकेतस्थळाची यूआरएल तपासावी.
- यूपीआय लिंकवर क्लिक करण्याआधी पाठविणारा कोण हे पाहावे.
- केवळ अधिकृत ॲप स्टोअरमधून ॲप डाऊनलोड करावीत.
- मोबाइल, संगणकाचे सुरक्षा अपडेट टाळू नयेत.
- बँक, यूपीआय खात्याचे व्यवहार नियमितपणे तपासावेत.
- सार्वजनिक ठिकाणी व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्कचा वापर करावा.
- मोबाइल, संगणकामध्ये अँटी व्हायरसचा वापर करावा.
सणासुदीच्या काळात नागरिकांमध्ये एकप्रकारचा उत्साह असतो. या उत्साहाच्या भरात अनेकवेळा ऑनलाइन व्यवहार करताना आवश्यक गोष्टी व्यवस्थितपणे तपासून पाहिल्या जात नाहीत. याचाच फायदा सायबर गुन्हेगार घेतात. त्यामुळे या काळात ऑनलाइन व्यवहार करताना अधिक काळजी घ्यायला हवी. याचबरोबर तुमचा मोबाइल आणि संगणकीय उपकरणे, बँकिंग ॲप अद्ययावत ठेवावीत. – स्नेहा काटकर, प्रमुख, उत्पादन धोरण, क्विक हील टेक्नॉलॉजीज