वैराण, ओसाड प्रदेशात प्रवास करताना, रस्त्याच्या कडेला अचानक आकर्षक लालभडक फुले आपले लक्ष वेधून घेतात. जवळ जाताच लक्षात येते, अरे हा तर निवडुंग. ही फुलेच नाही तर निवडुंगाच्या झाडाचा आकारही आकर्षक असतो. उष्ण, रखरखीत, कोरडय़ा हवामानात, निकृष्ट जमिनीत, वाळवंटी प्रदेशात, महिनोन महिने पाण्याच्या थेंबाशिवाय तग धरू शकणारे निवडुंग हा निसर्गातल्या विविधतेचा चमत्कारच. पाण्याशिवाय जगणे हे यांचे वैशिष्टय़. वाळवंट हीच मातृभूमी. कॅक्टसी कुटुंबाच्या आकारामध्ये प्रचंड विविधता आहे. याच्या खोडाचे विविध आकार आपल्याला मोहात पाडतात. महाकाय, उंच निवडुंगापासून अंगठय़ाएवढय़ा छोटय़ा आकाराचे निवडुंग बघायला मिळतात. कधी हाताच्या पंजासारखा आकार तर कधी उंच निमुळत्या काठीचा आकार, कधी गोल बॅरलसारखा तर कधी बाटलीसारखा आकार. वाळवंटी प्रदेशात अनुसरून खोडं जाड, मांसल झाली, तर पानांची जागा काटय़ांनी घेतली. या काटय़ांची विविधता म्हणजे निसर्गाचा आणखी एक चमत्कार. हे काटे कधी कापूस पिंजून टाकण्यासारखे, कधी बर्फ भुरभुरल्यासारखे, कधी मखमली सोनेरी ठिपक्यांसारखे तर कधी तीक्ष्ण सुयांसारखे. या काटय़ांचे सौंदर्य आपल्याला मोहात पाडते, अन एखादे तरी कॅक्टस आपल्या बागेत असावे असे आपल्याला वाटते. रोपवाटिकेतून याचे रोप आणल्यावर छोटय़ा कुंडीत वाळूचा चाळ, माती अथवा विटांचा चुरा, माती भरून रोप लावावे. पाणी अगदी कमी लागत असल्याने, पाण्याचा नीट निचरा होणे गरजेचे असते.एकदा कुंडीत लावल्यावर निवडुंगास अजिबात देखभाल लागत नाही. ऊन मात्र आवडते. शोभिवंत दगड व विविध प्रकारची कॅक्टस लावून बागेतला एखादा कोपरा छान सजवता येतो. कॅक्टस प्रजाती कुटुंबवत्सल आहे. त्यामुळे मूळ रोपास असंख्य पिल्ले येत राहतात. हे एकत्र कुटुंब सुंदर दिसते, पण कुंडीत फार गर्दी झाल्यास अथवा खूप उंच वाढल्यास तुकडा अलगद काढून दुसरे रोप करता येते. निवडुंग हाताळताना हातात मोजे घालावेत. काटय़ांच्या एखाद्या ठिपक्यात असंख्य काटे असतात. ज्यामुळे हाताची आग होणे,खाज सुटणे असा त्रास होऊ शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अगदी छोटय़ा बाल्कनीत कोनाडय़ात, एखाद्या कोपऱ्यात अगदी टेबलावरसुद्धा कॅक्टस शोभून दिसते. मोठी जागा, फार्म हाऊस यासारख्या ठिकाणी फडय़ा निवडुंग फेरी कॅसल हे रानोमाळ दिसणारे निवडुंग कुंपणापाशी लावता येतात. तर झेब्रा कॅक्टस वनी इयर्स छोटय़ाशा कपातही छान रहाते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cactus plants in house
First published on: 24-05-2017 at 02:03 IST