पैशांमागे लागताना माणसाची हाव काही सुटत नाही. पैसे मिळविण्यातून चंगळवाद आणि चंगळवादातून भ्रष्टाचार वाढतो. पैसा माणसाला अतृप्त ठेवतो. सगळेच असंतुष्ट का आहेत? त्यापेक्षा आपण गरजा कमी ठेवल्या तर नाही का चालणार, असा सवाल ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांनी रविवारी उपस्थित केला.
‘उन्मेष प्रकाशन’ तर्फे सतारवादक विदुर महाजन यांच्या ‘शोधयात्रा’ या पुस्तकाचे प्रकाशन अवचट यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे, सामाजिक कार्यकर्ते विनय हर्डीकर, बालगंधर्व संगीत रसिक मंडळाचे अध्यक्ष सुरेश साखवळकर आणि प्रकाशिका मेधा राजहंस या वेळी उपस्थित होत्या.
अनिल अवचट म्हणाले,‘‘वणवण करण्यातून घडण झाली की माणसाला शहाणपण येते. विदुर महाजन हा काही भाषण देणारा कार्यकर्ता नाही. पण, आपल्यावर झालेला अन्याय आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देत ते कार्यकर्ते झाले. हा त्यांचा अनुभव वाचून मन शुद्ध करणारे आणि प्रसंगी प्रत्येकाला लढायला लावण्याचे सामर्थ्र्य या पुस्तकामध्ये आहे.’’
डॉ. मोरे म्हणाले, ‘मऊ मेणाहूनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे’ हा तुकाराम महाराजांचा अभंग महाजन यांनी आचरणात आणला. संवेदनशील माणसाच्या आत्मकथनातून कौटुंबिक नातेसंबंध उत्कटपणे उलगडतात. त्यांची स्वरयात्रा ही शोधयात्रेला पूरक अशीच आहे.
विनय हर्डीकर, सुरेश साखवळकर, मेधा राजहंस आणि विदुर महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. पूर्वार्धात महाजन यांची कन्या नेहा हिने आपल्या सतारवादनातून राग ‘यमन’चे सौंदर्य उलगडले. अपर्णा महाजन यांनी सूत्रसंचालन केले.