दत्ता जाधव
पुणे : ढगाळ हवामान, तापमानात अचानक झालेली वाढ आणि २४, २५ मे रोजी पडलेल्या पावसाचा परिणाम म्हणून यंदा आंबा प्रक्रियेसाठी (कॅनिंग) जाण्याचे प्रमाण वाढले आहे. कॅनिंगला जाणारे आंबे २८ ते ३० रुपये दराने विकले जात असल्यामुळे उत्पादन खर्चही निघत नाही अशी उत्पादकांची तक्रार आहे. कॅनिंगसाठीच्या आंब्यांना किमान ४० रुपये प्रतिकिलोचा दर मिळावा, अशी मागणी आंबा उत्पादक करीत आहेत. एक मेपासून कोकणात आंबा कॅनिंगला जाऊ लागला आहे. एकूण आंब्यांपैकी ६० टक्के आंबा १ मे ते २० मे दरम्यान काढणीस आला आहे. कमी काळात जास्त आंबा काढणीला आल्यामुळे मजूर टंचाई जाणवत आहे. आंबा काढणी आणि काढणीनंतरच्या व्यवस्थापनासाठी मजूर मिळेना झाले आहेत. आंबा वेळेत काढणी न करणे, तो योग्य प्रकारे पिकविण्यासाठी न ठेवणे, ढगाळ हवामान, अचानक तापमान वाढल्यामुळे फळमाशीचा प्रादुर्भाव वाढला आहे. अखेरच्या टप्प्यात पाऊस झाल्यामुळे आंब्यावर डाग पडले आहेत. असा आंबा निर्यात करता येत नाही, बाजारातही डाग लागलेल्या आंब्याला मागणी असत नाही. हा आंबा फेकून देण्यापेक्षा शेतकरी कॅनिंगला देतात. अखेरच्या टप्प्यातील सुमारे ४० टक्के आंबा कॅनिंगला जाणार आहे. मात्र, कॅनिंगचे दर २८ रुपयांपासून ३२ रुपयांपर्यंत आहेत. हा दर उत्पादन खर्चापेक्षाही कमी आहे. किमान ४० रुपये प्रतिकिलो दर दिल्यास शेतकऱ्यांचा किमान उत्पादन खर्च निघून दिलासा मिळेल, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

यंदा नैसर्गिक आपत्तींचा मोठा फटका हापूसला बसला. एकूण उत्पादनाच्या सुमारे ४० टक्के आंब्याचे नुकसान झाले आहे. ढगाळ हवामानामुळे फळगळती मोठय़ा प्रमाणावर झाली होती. एकूण उत्पादनात घट होणे, आंब्याच्या दर्जावर परिणाम होणे, मंजूर टंचाई आणि कमी काळात जास्त आंबा बाजारात येणे, अशा अनेक समस्यांना यंदा सामोरे जावे लागले. आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरात फारसे काही पडले नाही.-विवेक भिडे, अध्यक्ष, कोकण हापूस उत्पादक आणि विक्रेता संघ

प्रतिक्रिया अखेरच्या टप्प्यात झालेला पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे आंब्यावर डाग पडण्याचे प्रमाण वाढले आहे. फळमाशीचाही प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे निर्यातीसाठीच्या दर्जेदार आंब्याचे उत्पादन यंदा कमी झाले आहे. राज्यातील बाजारपेठांमध्येही अशा आंब्याला ग्राहक मिळत नाही. त्यामुळे कमी दर्जाचे आंबे कॅनिंगला जात आहेत.-धनंजय गोलम, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा, वेंगुर्ला)