राज्यातील वेगवेगळ्या शहरात जाऊन जस्ट डायलवरून मोटारची नोंदणी करायची अन् प्रवासात निर्मुष्य ठिकाणी चालकाला मारहाण करून ती मोटार चोरायची. त्या मोटारीची बनावट कागदपत्रे तयार करून तिची विक्री करायची, अशा पद्धतीने चोऱ्या करणाऱ्या टोळीपैकी तिघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून विविध ठिकाणचे मोटार चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आणून दोन फिएस्टा कार, दोन इनोव्हा, मोटारसायकल व त्यांची बनावट कागदपत्रे असा तीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
राकेश अशोक पडवळ (वय २३, रा. आनंद पार्क, विश्रांतवाडी), सचिन शिवाजी पडवळ (वय २३) आणि सुभाष मिठालाल फुलमाळी (वय २०, रा. दोघेही लोणी धामणी, ता. आंबेगाव, पुणे) अशी दोघांना अटक केली आहे. या प्रकरणी शकील सय्यद (रा. बुलढाणा) हे फरार आहेत. सय्यद हा मोटारीची बनावट कागदपत्रे तयार करण्यात हुशार आहे. या आरोपींकडून नाशिक, चाकण, औरंगाबाद, संगमनेर, पारनेर या ठिकाणचे वाहनचोरीचे पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे यांनी दिली.
विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोलेरो मोटार प्रवासी म्हणून आलेल्या तिघांनी चाकूचा धाक दाखवून चोरून नेल्याच्या गुन्ह्य़ाचा तपास गुन्हे शाखेच्या युनिट चार समांतर करत होते. पोलीस कर्मचारी दिनेश शिंदे यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली, की बनावट कागदपत्र बनविलेली इनोव्हा मोटार विक्रीसाठी आळंदी रस्त्यावर येणार असल्याची माहिती मिळाली.  त्यानुसार पोलीस निरीक्षक अरुण वालतुरे यांनी सापळा रचून मुख्य आरोपी राकेशला अटक केली. त्याच्याकडे काही मोटारींचे बनावट कागदपत्रे, आरटीओचे बनावट शिक्के, कोरे अर्ज मिळून आले. त्याच्याकडे तपास केल्यानंतर इतर दोघांना अटक केली. तिघे जण राज्यातील विविध शहरात जाऊन ‘जस्टडायल’ वर फोन करून भाडय़ाने मोटारची मागणी करत असत. प्रवासादरम्यान निर्मनुष्य ठिकाणी मोटार आल्यास चालकास चाकूचा धाक दाखवून मारहाण करून सोडून देऊन त्याच्या ताब्यातील मोटार चोरून नेत असत. त्या मोटारीचे चासी व इंजिन क्रमांक बदलून बनावट कागदपत्रे तयार करून त्या मोटारी विकत होते, असे भामरे यांनी सांगितले.