मुक्त मार्ग तयार करून केवळ सहा मिनिटांत हृदयाचा प्रवास

राज्यात हृदय प्रत्यारोपण करणारे मुंबईबाहेरील द्वितीय क्रमांकाचे शहर म्हणून पुण्याला रविवारी ओळख प्राप्त झाली. सोलापूरच्या एका कुमारवयीन मेंदू मृत रुग्णाचे हृदय विशेष विमानाने पुण्यात आणण्यात आले. रुबी हॉस्पिटलमध्ये रविवारी सायंकाळी ४९ वर्षांच्या रुग्ण महिलेवर या हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली.

नवीन वर्षांत राज्यातील मुंबईबाहेरील पहिले हृदय प्रत्यारोपण पुण्यातच होणार, अशी अपेक्षा व्यक्त होत असताना काही दिवसांपूर्वी हा मान औरंगाबादला मिळाला होता. रविवारी मात्र पुण्यातील पहिले व मुंबईबाहेरील दुसरे हृदय प्रत्यारोपण झाले. सोलापूर येथील रुग्णालयात दाखल असलेल्या १५ वर्षांच्या मुलाला मेंदू मृत घोषित करण्यात आले होते. त्याचे अवयव दान करण्यास त्याच्या नातेवाइकांनी संमती दर्शवल्यानंतर त्याचे हृदय आणण्यासाठी पुण्यातील रुबी हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा चमू रविवारी सकाळी ८ वाजता विशेष विमानाने सोलापूरला रवाना झाला. दात्याच्या शरीरातून शस्त्रक्रियेद्वारे हृदय काढून त्यासह संध्याकाळी ५ वाजता ते विमानाने पुण्याला येण्यासाठी निघाले आणि ६ वाजून २४ मिनिटांनी लोहगाव विमानतळावर पोहोचले. विमानतळापासून ‘रुबी’पर्यंत मुक्त मार्ग (ग्रीन कॉरिडॉर) तयार करून ८ किलोमीटरचे अंतर केवळ ६ मिनिटांत कापण्यात आले आणि संध्याकाळीच हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली.

‘रुबी’चे वैद्यकीय संचालक डॉ. संजय पठारे यांनी ही माहिती दिली. या हृदय प्रत्यारोपणासाठी मार्गदर्शक म्हणून चेन्नई येथील प्रसिद्ध हृदय प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. के. आर. बालकृष्णन पुण्यात आले होते. प्रसिद्ध हृदयविकार तज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ, डॉ. मनोज दुराईराज, डॉ. चंद्रशेखर मखळे, डॉ. आशिष खनिजो, डॉ. विकास साहू यांच्या चमूने ही शस्त्रक्रिया केली. रुग्णालयातील ‘झोनल ट्रान्सप्लान्ट कोऑर्डिनेशन सेंटर’च्या (झेडटीसीसी) समन्वयक सुरेखा जोशी यांनी पुण्यात, तर अभिजित शिवणकर यांनी सोलापूर येथे समन्वय साधला.