शिवाजी खांडेकर

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण म्हटले की प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांना सेवेच्या काळात तीन वर्षांचा मिळालेला आराम असे समीकरण तयार झाले आहे. मात्र, काही मोजके अधिकारी प्रामाणिकपणे काम करून आपल्या कामाचा ठसा उमटवतात. सतीशकुमार खडके यांच्या जागी नव्याने नियुक्त होणारे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद यादव यांना ती संधी मिळणार आहे. सध्या सुरू असलेल्या कामाचा वेग कायम ठेवून कामचुकार अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्याचे आव्हानही यादव यांच्यापुढे आहे.

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची स्थापना झाल्यापासून प्राधिकरण या ना त्या कारणावरुन नेहमीच चर्चेत राहिले आहे. सुनियोजित शहर तयार करण्यासाठी स्थापन झालेल्या प्राधिकरणाच्या बहुतांश भूखंडाला अतिक्रमणाने विळखा घातला आणि सुनियोजित शहराच्या स्वप्नाचा चुराडा झाला. पेठ क्रमांक १ ते २९ मधील पेठांचा प्राधिकरणाने सुनियोजित विकास केला. मात्र, पेठ क्रमांक ३० ते ४१ पर्यंत बहुतांश भूखंडाला अतिक्रमणाने विळखा घातला गेला. सव्वा दोन वर्षांपूर्वी प्राधिकरणात मुख्य कार्यकारी अधिकारीपदी रुजू झालेले सतीशकुमार खडके यांनी प्राधिकरणाकडे शिल्लक असलेल्या भूखंडाचा विकास करण्याचा प्रयत्न केला. तसेच आरक्षणे विकसित करण्याचाही प्रयत्न केला. गेल्या चौदा वर्षांपासून प्राधिकरणाने एकही गृहप्रकल्प हाती घेतला नव्हता. खडके यांच्या कार्यकाळात साडेचौदा हजार सदनिकांचे प्रकल्प प्राधिकरणाने हाती घेतले.

रस्ते आणि उद्याने विकसित केली, विकास नियंत्रण नियमावलीत बदल करून सामान्य नागरिकांना वाढीव चटई क्षेत्र निर्देशांकाचा लाभ, अशी अनेक कामे खडके यांनी केली. याशिवाय नवीन भूसंपादन कायदा कलम २४ (२) चे खटले सर्वोच्च न्यायालयातून उच्च न्यायालयात आणण्याचे महत्त्वाचे कामही खडके यांच्या कार्यकाळात झाले. परंतु, विकासकामे करताना खाबूगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यामध्ये त्यांच्याकडून थोडी कसूर झाली. स्वत:ची तुंबडी भरणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे खडके यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्राधिकरण वर्तुळात थोडा वेगळाच राहिला.

दोन वर्षांपासून प्राधिकरणातील विकासकामांना वेग आला आहे. तो वेग कायम ठेवण्याचे प्रयत्न नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद यादव यांना करावे लागणार आहेत.

पेठ क्रमांक ४, ६, १२, ३१ आणि ३२ मध्ये हाती घेतलेले गृहप्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी यादव यांना लक्ष द्यावे लागणार आहे. पेठ क्रमांक ३१ आणि ३२ वाल्हेकरवाडी येथील गृहप्रकल्पाच्या कामाची गती वाढवावी लागणार आहे. प्राधिकरणातील बहुतांश आरक्षणाचा विकास झालेला नाही. त्याकडेही यादव यांना लक्ष द्यावे लागणार आहे.

अर्धवट स्पाईन रस्ता पूर्ण करून तो पूर्ण क्षमतेने वापरात आणण्यासाठी पावले उचलावी लागणार आहेत. बहुचर्चित आणि वादग्रस्त रिंग रोडचे काम राजकीय नेते आणि अतिक्रमणे केलेल्या नागरिकांना हाताशी धरून तो पूर्ण करण्याचे मोठे आव्हान यादव यांच्यापुढे आहे. प्राधिकरणामध्ये मूळ अधिकारी आणि प्रतिनियुक्तीवरील अधिकारी यांच्यामध्ये ताळमेळ जुळत नाही. काही मूळ अधिकारी प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांची दिशाभूल करून मर्जीप्रमाणे काम करण्यात पटाईत आहेत.

कामांचे विषम वाटप होत असल्याने काही प्रमाणिक अधिकाऱ्यांना तोंड दाबून बुक्क्य़ांचा मार सहन करावा लागतो. त्यामुळे असे प्रकार यादव यांना थांबवावे लागणार आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी प्राधिकरणाने संपादित केल्या आहेत. त्यांना साडेबारा टक्के परतावा देण्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्या प्रश्नावरही यादव यांची भूमिका महत्त्वाची आहे.

दररोज सरासरी तीन सायबर गुन्हे

इंटरनेच्या वापरामुळे जग खूप जवळ आले आहे. विविध वयोगटातील लोकांकडून इंटरनेटचा वापर केला जात आहे. इंटरनेट वापरताना सुरक्षिततेची काळजी घेतली गेली नाही तर फसवणुकीचे प्रकार हमखास घडतात. इंटरनेटच्या वापरामुळे सायबर गुन्ह्य़ाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप, ट्विटर, पिन्टरेस्ट, ई-मेल यासह अनेक समाजमाध्यमांवरून फसवणूक झालेल्यांचे प्रमाण वाढत आहे. पिंपरी पोलीस आयुक्तालयाच्या सायबर सेलची स्थापन झाल्यापासून पावणेचार महिन्यात साडेतीनशे तक्रारींची नोंद झाली आहे. सायबर तक्रारी दाखल झाल्यानंतर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण अतिशय नगण्य आहे. २४ ऑक्टोबर २०१८ पासून १५ फेब्रुवारीपर्यंत तीनशे तक्रारी सायबर सेलकडे दाखल झाल्या होत्या. त्यातील केवळ तीन तक्रारीमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे अभासी जगात वावरताना नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे. खासगी माहिती समाजमाध्यमांवर देऊ नये, अनोळखी लोकांची खात्री केल्याशिवाय मैत्री स्वीकारू नये, व्यावसायिक संकेतस्थळांची सत्यता तपासूनच आर्थिक व्यवहार केले पाहिजेत. गुगल लोकेशन कधीही कोणाला देऊ नये. लॉटरी लागली आहे, सीमा शुल्क विभागात पैसे अडकले आहेत, रमी खेळा जिंका लाखो रुपये असे अनेक खोटी आमिषे दाखवून नागरिकांची फसवणूक केली जाते. समाज माध्यमांवर महिलांच्या नावाने खोटे खाते (अकाउंट) उघडून त्याद्वारे प्रेमाचे आमिष दाखविले जाते. तसेच काही महिला प्रेमाच्या खोटय़ा आमिषाने आपल्या जाळ्यात ओढून लुटण्याचे प्रकार करतात. अशा आभासी जगात जगताना सत्यता पडताळून आणि सुरक्षितता बाळगून इंटरनेटचा वापर केला पाहिजे. भविष्यात समोरासमोर वादातून होणाऱ्या गुन्ह्य़ापेक्षा इंटरनेट, समाजमाध्यामांमुळे होणाऱ्या गुन्ह्य़ात वाढ होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी आभासी आणि फसव्या जगापासून सावध राहण्याची काळजी घेणे गरजेचे आहे.