पुणे, नागपूर : उत्तर आणि मध्य भारतातील तापमानात आणखी वाढ झाल्याने विदर्भातील उष्णतेची लाट तीव्र झाली असून, या विभागात देशातील विक्रमी तापमानाची नोंद होत आहे. यावर्षी पहिल्यांदाच एप्रिल महिन्यात चंद्रपूर शहरात ४६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली असून ते जगातील पाचव्या क्रमांकाचे उष्ण शहर ठरले आहे.
विदर्भापाठोपाठ उत्तर महाराष्ट्रातही उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण झाली आहे. मराठवाडय़ाचा पाराही उच्चांकी पातळीवर पोहोचल्याने राज्यात सर्वत्र होरपळ कायम आहे. आणखी सुमारे चार दिवस काहिली कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात शुक्रवारी (२९ एप्रिल) पावसाने हजेरी लावली.
देशाच्या उत्तर, उत्तर-पश्चिम आणि मध्य भागातील सर्वच राज्यांमध्ये दोन दिवसांपासून उष्णतेची लाट आली आहे. त्याचा परिणाम म्हणून अकोला, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आणखी एक दिवस उष्णतेची लाट तीव्र राहणार असून, पुढील पाच दिवस लाटेची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
विदर्भाबरोबरच उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदूरबार, जळगाव आदी भागातही तापमानात मोठी वाढ होऊन उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण झाली आहे. मध्य महाराष्ट्रात जळगाव, नगर, सोलापूर ४३ ते ४४ अंश सेल्सिअस, तर पुणे, सातारा आदी भागात ४० अंशांवर कमाल तापमान आहे. मराठवाडय़ात ४२ ते ४४ अंशांदरम्यान कमाल तापमान आहे.
विदर्भस्थिती.
संपूर्ण विदर्भातच पारा चढला आहे. गेल्या १०० वर्षांत दुसऱ्यांदा एप्रिल महिन्यात एवढय़ा उच्च तापमानाची नोंद झाली आहे. चंद्रपूरपाठोपाठ अकोला ४५.८, ब्रम्हपुरी ४५.६, वर्धा ४५.५, नागपूर व यवतमाळ ४५.२, अमरावती ४५ अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
पावसाचीही हजेरी..
पश्चिम महाराष्ट्रात मात्र तापमानवाढीसह पावसाळी वातावरण आहे.महाबळेश्वर येथे पावसाने हजेरी लावली, पुणे जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी शुक्रवारी पाऊस झाला.

मंत्रिपदावरून हकालपट्टीच्या मागणीवर भुजबळ म्हणाले, “छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल मनात…”