नाटक हे मनोरंजनाचे माध्यम आहे की लोकशिक्षणाचे माध्यम असा प्रश्न अनेकांना पडतो. पण, ‘नाटक हे नाटक असावं’ ही धारणा असलेल्या सतीश आळेकर यांनी नाटकाची संकल्पनाच बदलली, असे मत ज्येष्ठ दिग्दर्शक अरुण खोपकर यांनी गुरुवारी व्यक्त केले. नाटक हे बघणाऱ्याच्या डोळ्यांत आणि कानात असतं. तिथून उचलून ते रंगमंचावर आणण्याचे काम आळेकरांच्या नाटकांनी केले, असा गौरवही खोपकर यांनी केला.
सतीश आळेकर यांच्या ‘महानिर्वाण’ नाटकाला ४० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे आयोजित ‘नाटककार सतीश आळेकर’ या तीन दिवसांच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन अरुण खोपकर यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ गायक-अभिनेते चंद्रकांत काळे अध्यक्षस्थानी होते. विभागप्रमुख प्रा. अविनाश सांगोलेकर आणि चर्चासत्राचे संयोजक प्रा. अविनाश आवलगावकर या वेळी उपस्थित होते.
संगीताच्या माध्यमातून उपहास करावयाचा असेल तर संगीताचा उपहास करून चालणार नाही. हा धडा भास्कर चंदावरकर यांनी ‘घाशीराम कोतवाल’ नाटकाच्या संगीतातून दिला. अस्सलता असेल तरच उपहास साधता येतो. केवळ जीवनावर नव्हे तर मृत्यूवरही भाष्य करण्यासाठी उपहास हाच उत्तम मार्ग आहे. सतीश आळेकर यांच्या नाटकांतही त्याचेच प्रतििबब दिसते. ही नाटके एका पिढीचे मनोगत बोलणारी आहेत, असे सांगून अरुण खोपकर म्हणाले, आळेकरांचा आविष्कार हा वैयक्तिक स्वरूपाचा आणि बाहेरचा वाटत नाही. त्यांच्या नाटकातील संवेदनशीलतेची वेगळी पण, मनाला आनंद देणारी रूपे भावतात. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी, नाटय़छटाकार दिवाकर आणि चिं. वि. जोशी हे आळेकर यांचे पूर्वसुरी आहेत. या सर्वाच्या लेखनातील समांतर आरसे प्रतिमांच्या मालिका निर्माण करतात. असे आरसे आपल्याला आळेकरांच्या नाटकात दिसतात. संगीतामध्ये आहेत तशी घराणी साहित्यामध्येही बघावी लागतात. एखादी चीज घेण्यासाठी मानसिक तयारी असावी लागते. एखादी चीज अनेक कलाकार गातात तेव्हा त्या चीजेमध्ये असलेल्या आत्म्याला ते मुक्त करतात. आळेकरांच्या नाटकामध्ये िवगेतून पाहणाऱ्या माणसाची भूमिका आहे.
भास-आभासाच्या खेळात वास्तवतेच्या खाणाखुणा आळेकरांच्या नाटकांत दिसतात. ही क्षणार्धात बदलणारी रूपे नट म्हणून मला आव्हानात्मक वाटली. लेखक-दिग्दर्शक म्हणून आळेकर एकसंघ वाटतात, अशी भावना चंद्रकांत काळे यांनी व्यक्त केली. प्रा. अविनाश आवलकगावकर यांनी प्रास्ताविकामध्ये चर्चासत्रामागची भूमिका स्पष्ट केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Change idea of drama by satish aalekar
First published on: 30-01-2015 at 02:38 IST