पुणे : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएस) १८ डिसेंबर रोजी होणार आहे. यंदा या परीक्षेत काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. त्यात पालकांच्या उत्पन्नाची मर्यादा दीड लाख रुपयांवरून साडेतीन लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली असून शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना चारऐवजी पाच वर्षे दरमहा एक हजार या प्रमाणे दर वर्षी बारा हजार रुपये शिष्यवृत्ती मिळेल.
राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी एनएमएमएस परीक्षेच्या अर्ज प्रक्रियेची माहिती प्रसिद्धपत्रकाद्वारे दिली. परीक्षेचे प्रवेश अर्ज १० ऑक्टोबरपासून https://www.mscepune.in/ आणि https://nmmsmsce.in या संकेतस्थळाद्वारे उपलब्ध करण्यात आले आहेत. आठवीतील विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते. आर्थिक दुर्बल घटकांतील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे, आर्थिक दुर्बलतेमुळे विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणातील गळती रोखणे या योजनेचे उद्दिष्ट आहे. विनाअनुदानित शाळा, केंद्रीय विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय, सैनिकी शाळा आदी शाळांतील विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते.
विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी ३१ ऑक्टोबपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येईल. ५ नोव्हेंबपर्यंत विलंब प्रवेश अर्ज, तर १० नोव्हेंबपर्यंत अतिविलंब प्रवेश अर्ज भरता येईल. परीक्षेत बौद्धिक क्षमता चाचणी आणि शालेय क्षमता चाचणी हे दोन पेपर असतील. यंदा या परीक्षेतील पालकांच्या उत्पन्नाची मर्यादा आणि शिष्यवृत्तीचा कालावधी वाढल्याने विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढण्याची अपेक्षा आहे.