पुण्यात आयटी आणि कार्पोरेट क्षेत्रातील सर्वाधिक तरूण हे चरस आणि ब्राऊन शुगरचे सर्वात मोठे ग्राहक असल्याचे समोर आले आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडलेल्या आरोपींकडे चौकशी केल्यानंतर ही गोष्ट समोर आली आहे.
गेल्या आठवडय़ात अमली पदार्थ विरोधी पथकाने उत्तर प्रदेशमधून विक्रीसाठी आणलेले सुमारे ५२ लाख ५० हजार रुपये किमतीचे कोकेन पकडून चार आरोपींना अटक केली होती. त्याच बरोबर गेल्या महिन्यात ब्राऊन शुगर आणि चरस  विक्रीप्रकरणात सात जणांस अटक करून त्यांच्याकडून दीड किलो चरस आणि तीनशे वीस ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त केली होती. या अटक केलेल्या आरोपींकडे चौकशी केल्यानंतर ही बाब समोर आली आहे.
याबाबत पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांनी सांगितले की, खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरून आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्य़ांचा तपास करून आरोपींचे जबाब घेण्यात आले. त्या वेळी आरोपींकडून ब्राऊन शुगर आणि चरस खरेदी करणारे सर्वाधिक ग्राहक हे आयटी आणि कार्पोरेट क्षेत्रातील असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच बरोबर याच क्षेत्रातील व्यक्ती अमली पदार्थाचे ग्राहक होण्याची संख्या वाढत असल्याचे त्यांच्या माहितीमधून समोर आले आहे. चौकशीत या आरोपींनी असे सांगितले आहे की, नियमित स्वरूपात अमली पदार्थाचे सेवन करणारे ग्राहक आता अमली पदार्थाच्या नशेच्या आहारी गेले आहेत. या गोष्टीची कल्पना आयटी आणि कार्पोरेट कंपन्यांना देण्यात आली आहे. आम्हीही व्यसन मुक्तीसाठी काम करणाऱ्या ‘मुक्तांगण’ सारख्या संस्थेच्या मदतीने या कंपन्यामध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अटक केलेल्या आरोपींनी चौकशीत असेही सांगितले की, चरस आणि ब्राऊन शुगरचे पुण्यात असलेले आयटी व कार्पोरेट सेक्टरमधील ग्राहक हे मुख्यत्वे करून महाराष्ट्राबाहेरील आहेत. नशेसाठी ते मोठी किमत देण्यासाठी सदैव तयार असतात. त्यांनी अमली पदार्थ विक्रेत्यांशी थेट संपर्क  साधून चरस, ब्राऊन शुगरची मागणी केली आहे. अमली पदार्थाच्या तस्करीसाठी मुख्य करून इंटरनेटचा वापर केला जातो. आयटी आणि कार्पोरेट क्षेत्रातील बहुतांश व्यक्ती कुटुंबापासून दूर असतात. त्यांच्यावर कामाचाही ताण असतो. त्यामुळे ते नशेसाठी अमली पदाथार्ंचा आधार घेतात.