वयाची साठी उलटली की माणसाला वेध लागतात ते चारधाम यात्रेचे. पण, आजारपणातून कोमात गेलेले आणि त्यातून बाहेर आल्यानंतर प्रकृती साथ देत नसताना मोटारीने २५ दिवसात भारताच्या चारही टोकांना भेट देण्याचा विक्रम डॉ. सुनीलदत्त चौधरी यांनी केला आहे. या विक्रमाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये व्हावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत. दिवसाला ५३३ किलोमीटर वाहन चालवित कन्याकुमारी, तेझु, लेह आणि कोटेश्वर या चारही टोकांना भेट देत त्यांनी १३,८३५ किलोमीटर अंतर पार केले.
व्यवसायाने होमिओपॅथी डॉक्टर असलेल्या डॉ. चौधरी यांचे शिक्षण पुण्याच्या धोंडुमामा साठे होमिओपॅथी इन्स्टिटय़ूटमध्ये झाले आहे. सध्या ते जळगाव येथे वास्तव्यास आहेत. त्यांनी याआधीही पाच वर्षांपूर्वी भारताच्या उत्तर आणि दक्षिण टोकांदरम्यान वाहनातून प्रवास करीत लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये आपल्या कामगिरीची नोंद केली आहे. त्यावेळी त्यांनी कन्याकुमारी येथून सुरुवात करीत लेहमध्ये या सफरीची सांगता केली.
भारताच्या चारही टोकांना भेट देण्याच्या मोहिमेची सुरुवात चौधरी यांनी ३० ऑक्टोबर रोजी सकाळी केली. ४,२८४ किलोमीटर अंतर कापून ते ८ नोव्हेंबर रोजी सकाळी अरुणाचल प्रदेशातील तेझु येथे पोहोचले. या प्रवासात भुवनेश्वरपासून ६८ किलोमीटर अंतरावर असताना त्यांचे वाहन नादुरुस्त झाले. त्यांना जवळपास दहा तास तांगी अभयारण्याच्या सीमेवर एकाकी अवस्थेत काढावे लागले. त्यांची मोटार ८० किलोमीटर अधिक वेगाने धावू शकत नसल्याने इंजिन थंड करण्यासाठी त्यांना अनेक वेळा थांबावे लागले. तेझुहून ४,१४७ किलोमीटर अंतर कापून १७ नोव्हेंबरला ते लेहमध्ये पोहोचले. तेथून २,६४९ किलोमीटर अंतर पार करून २२ नोव्हेंबर रोजी गुजरातमधील नारायण सरोवर येथे पोहोचले आणि तेथून त्यांनी  कन्याकुमारीपर्यंत परतीचा प्रवास केला.
या मोहिमेच्या यशस्वीतेनंतर डॉ. चौधरी म्हणाले, देशाच्या चारही टोकांना भेट देण्याची कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरल्याचा मला आनंद आणि अभिमान आहे. मुलगा रामकृष्ण याचे स्वप्न साकार करण्यासाठी हाती घेतलेली ही मोहीम अनेक अडथळ्यांवर मात करीत पूर्ण केली. एक आव्हान आणि साहस म्हणून पेलण्यामध्ये मला यश आले.