प्लायवुडच्या कंपनीच्या जाहिरातीचे चित्रीकरण करण्यासाठी मिस इंडिया वन्या मिश्राशी करार करून देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाची साडेचार लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चतु:शंृगी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहन सोमजी पटेल (वय ४०, रा. निर्मलनगर सोसायटी, शंकरशेठ रस्ता) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यावरून जय चिमनलाल देसाई (रा. सांताक्रुज, मुंबई) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सांताक्रुज पोलिसानी शून्य क्रमांकाने गुन्हा दाखल करून चतु:शंृगी पोलिसांकडे वर्ग केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या मंगळवारी देसाई हा पुण्यात काही कामाच्या निमित्ताने आला होता. सेनापती बापट रस्त्यावरील जे. डब्लू मेरिअट हॉटेल येथे पटेल यांना भेटले. यावेळी देसाई याने पटेल यांना त्यांच्या मेपल प्लायवुड कंपनीच्या जाहिरातीच्या चित्रीकरणासाठी मिस इंडिया व मॉडेल वन्या मिश्रा हिच्या सोबत करार करून देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी पटेल यांच्याकडून करारासाठीचे साडेचार लाख रुपये घेतले. ठरलेलेल्याप्रमाणे करार करून न दिल्यामुळे पटेल यांनी सांताक्रुज येथे देसाईकडे जाऊन चौकशी केली. मात्र, त्यांची भेट झाली नाही. म्हणून त्यांनी सांताक्रुज येथील पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. त्यांनी तक्रार दाखल करून हा गुन्हा चतु:शंृगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्यामुळे त्यांच्याकडे हा गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास एम. जी. बाळकोटगी करत आहेत.