छत्रपती शिवाजी महाराज व शाहू महाराजांचं स्वप्न होतं की आपला माणूस आपल्यापेक्षा मोठा झाला पाहिजे. मल सांगा आरक्षण मिळालं आहे, पण यामुळे सर्व गोष्टी नीट होणार का? नाही होणार. आपल्याला सारथीच्या माध्यामातून बार्टीच्या तत्वावर आपल्या समाजाच्या लोकांना अधिकारी करू शकलो, त्यांना शिष्यवृत्ती देऊ शकलो. एमफील, पीएचडी या सारख्या ठिकाणी आपण मदत करू शकलो. तरच खऱ्या अर्थाने शाहू महाराजांच्या नावाने ही जी संस्था आहे. तर तिला जीवनस्मारक म्हटलं जाईल, मात्र हे जीवनस्मारक नाही. हे तर सारथी कशी मोडून काढाता येईल, या दृष्टीकोणातून एका व्यक्तीचं कारस्थान सुरू असल्याचा आरोप खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी केला आहे. तसेच, या संस्थेशी संबंधित असलेल्या जे. पी. गुप्ता या व्यक्तीस इतरत्र हलवले नाहीतर, पुढचा दौरा आमचा मुंबईला असणार असलाचा इशाराही खासदार संभाजी राजे यांनी यावेळी दिला.
राज्य सरकार मार्फत स्थापन करण्यात आलेल्या ‘सारथी’ संस्थेची स्वायतत्ता अबाधित ठेवण्यात यावी. ही संस्था बंद पाडण्याचे रचण्यात येत असलेले, षडयंत्र थांबविण्यात यावे, अशी मागणी करत, या संस्थेसाठी निधीची तरतूद व्हावी. या मागणीसाठी सारथी संस्थेच्या विद्यार्थीसह, खासदार छत्रपती संभाजी राजे, माजी खासदार सुबोध मोहिते हे सारथी संस्थेच्या कार्यालयाबाहेर उपोषणास बसले होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
एमपीएससी, बँकींग, नेटसेट याची तयारी करणाऱ्या विद्यार्थांचा खर्च कोण उचलणार? या विद्यार्थांना महिन्याकाठी पैसे कोण पुरवणार? सारथी स्थापन यासाठीच झाली होती की, अशा मुलांसाठी काहीतरी मदत करता येईल. मात्र, जर आपण अशी मदतच काही करू शकलो नाहीतर ही सारथी ठेवायचीच कशाला? असा संतप्त सवाल राजेंनी यावेळी केला.
तसेच, मी ज्यावेळी मुख्यमंत्र्यांना भेटलो तेव्हा त्यांनी मला विनंती केली की, अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायचा आहे. म्हणून आम्हाला वेळ द्या, मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आपण पुढे जाऊ. ही सगळी चर्चा सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी मला विचारलं की, सारथी बद्दल मला पूर्ण माहिती सांगा. म्हणजे मुख्यमंत्र्यांना माहित देखील नाही की काय कारस्थान सुरू आहे. किती हे दुर्देवं आहे. कोणीही मनमानी कारभार चालवायचा, राष्ट्रपती राजवट असताना सुद्धा चांगले निर्णय घ्यायचे असतात. जे मुलांच्यावर बाधक निर्णय़ आहेत ते तुम्ही घेत आहात. असे सांगत, या संस्थेशी संबंधित गुप्ता या व्यक्तीस इतरत्र हलवले नाहीतर, पुढचा दौरा आमचा मुंबईला असणार असलाचा इशाराही खासदार संभाजी राजे यांनी यावेळी दिला.