केंद्रीय मंत्र्यासह दिग्गज भाजप नेत्यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात भेटीगाठी आणि बैठकांचा सपाटा लावलेला असतानाच, शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन शिरूरमधील महत्त्वाच्या विविध विषयांना चालना मिळवून दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>पुणे : पार्टीचे आमंत्रण न दिल्याने तरुणावर शस्त्राने वार

शिरूर लोकसभा मतदारसंघातातील विविध विषयांसाठी मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. आढळराव यांच्यासह माजी आमदार शरद सोनवणे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याह राजेशकुमार, जे.पी. गुप्ता, बी. वेणूगोपाल रेड्डी, डॉ. अनुपकुमार यादव, वल्सा नायर-सिंह, डॉ. हर्षदीप कांबळे, सौरभ विजय, शैला ए. आदी सचिव दर्जाचे अधिकारी उपस्थित होते.

मौजे वढू-तुळापूर येथील स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानस्थळाचे नाव ग्रामस्थांच्या मागणीनुसार पूर्वीप्रमाणेच ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ’ करण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. जुन्नरला आंबेगव्हाण हे स्थळ बिबट सफारीसाठी अनुकूल असून जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचा सविस्तर आराखडा तयार करावा, असे आदेश देतानाच सुमारे ६५० हेक्टर क्षेत्रापैकी १०० ते १५० हेक्टर क्षेत्रावर आंबेगव्हाण येथे बिबट सफारी प्रकल्प साकारणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

हेही वाचा >>>पुणे : मिळकतकर वसुलीसाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती

राजगुरूनगर पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीचे काम भूमीपूजन झालेल्या ठिकाणीच करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिल्या. खानापूर येथील श्री कुकडेश्वर आदिवासी हिरडा प्रक्रिया उद्योग कार्यन्वित करण्यासाठी विशेष योजना तयार करावी, जेणेकरून हजारो कुटुंबीयांना रोजगार मिळेल, असे त्यांनी सांगितले. हिरडा या औषधी वनस्पतीचे उत्पादन करणाऱ्या श्री कुकडेश्वर आदिवासी हिरडा सहकारी उत्पादक संस्थेचे थकीत कर्ज भरण्यासाठी २ कोटी रक्कम विशेष बाब म्हणून देण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव आणण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्याचप्रमाणे, जुन्नर तालुक्यातील पूर येथील श्री क्षेत्र कुकडेश्वर मंदिराच्या संरचनेचे परिक्षण करण्याची कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिल्या.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief minister announcement to promote issues in khed junnar area pune print news amy
First published on: 16-09-2022 at 16:54 IST