इंदापूर: नूतन मराठी वर्ष प्रारंभाच्या पूर्वसंधीला  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आपले कुलदैवत इंदापूर तालुक्यातील नीरा नरसिंहपूर  येथील भीमा- नीरा नदीच्या संगमावरील प्राचीन व प्रसिद्ध श्री. लक्ष्मी नृसिंहाचे दर्शन घेऊन विधीवत पूजा,आरती करून दर्शन घेतले.यावेळी  क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार विजय शिवतारे, राहुल कुल,  माजी आमदार राम सातपुते, आदी उपस्थित होते. दरम्यान ,मुख्यमंत्र्यांनी श्री. क्षेत्र नीरा नरसिंहपूर विकास आराखड्यातील कामांच्या प्रगतीची अधिकाऱ्यांकडून व विश्वस्तांकडून माहिती घेतली.  देवस्थान ट्रस्टच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला.ग्रामस्थांच्या वतीने सरपंच अर्चना सरवदे तसेच सदस्यांनी स्वागत केले.

दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांच्या  प्रश्नांबाबत, कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री काही बोलतील, अशी शेतकऱ्यांमधून शक्यता व्यक्त होत होती. मात्र राज्यातील कोणत्याच प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी कुलदेवताच्या प्रांगणात भाष्य केले नाही.विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस प्रथमच इंदापूर तालुक्यात येत असल्याने या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. श्री. फडणवीस यांचे हेलिकॉप्टरने नीरा- नरसिंहपूर येथे आगमन झाल्यानंतर हेलिपॅडवरच  माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते  हर्षवर्धन पाटील व इंदापूर चे माजी सभापती विलास वाघमोडे यांनी श्री. फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी फडणवीस यांचा तुळशीहार घालून , विठ्ठलाची मूर्ती  सप्रेम भेट देऊन त्यांनी सत्कार केला.

विठ्ठलाच्या साक्षीनं फडणवीस यांच्या कुलदैवताच्या आवारात श्री. पाटील यांनी घेतलेल्या भेटीची बराच काळ चर्चा सुरू होती. या भेटी दरम्यान त्यांची काही चर्चा झाली किंवा कसे याबाबत काही तपशील मिळू शकला नाही. मात्र ,श्री .पाटील यांनी फडणवीस यांची घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान हर्षवर्धन पाटील यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश करून इंदापूर विधानसभा मतदार संघात निवडणूक लढवली. तत्पूर्वी इंदापूर तालुक्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी श्री .फडणवीस यांनी इंदापूर मध्ये कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा घेऊन, त्या मेळाव्यामध्ये इंदापूर तालुका आम्ही दत्तक घेत आहोत. इंदापूरला कधी वाऱ्यावर सोडणार नाही‌. अशी स्पष्ट ग्वाहीही दिली होती. यावेळी काही तोडगा निघून विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवारा  बरोबर श्री. पाटील दिसतील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र, श्री. पाटील यांनी भारतीय जनता पक्ष व महायुती सोडत राष्ट्रवादी काँग्रेस शरद  पवार गटात जाहीर प्रवेश करून महाविकास आघाडीची उमेदवारीही  मिळवली. आणि श्री. पाटील यांनी महायुतीचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांना लढत दिली. मात्र, अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत तिरंगी लढतीला श्री. पाटील यांना सामना करावा लागला.त्यात पाटील यांचा पराभव झाला. त्यानंतर राज्यामध्ये पुन्हा महायुतीचे  सरकार सत्तेत आले. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाल्यानंतर प्रथमच आपल्या कुलदैवताच्या दर्शनासाठी इंदापूर तालुक्यात आले होते. यावेळी श्री. पाटील यांनी विठ्ठलाची मूर्ती सप्रेम भेट देत, विठ्ठलाच्या साक्षीनं त्यांची घेतलेली भेट राजकीय चर्चांना उधाण आणणारी ठरली आहे.