मुख्यमंत्री, ठाकरे, पवार यांच्या उपस्थितीसाठी पिंपरी महापालिकेचे  प्रयत्न

स्वातंत्र्यलढय़ात बलिदान देणाऱ्या क्रांतिवीर चापेकर बंधूंचे स्मरण राहावे, यासाठी चिंचवडगावात त्यांचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय िपपरी महापालिकेने घेतला. बऱ्याच अडचणींचा प्रवास केल्यानंतर तब्बल सहा वर्ष रखडलेले हे स्मारक आता मार्गी लागले आहे. येत्या क्रांतिदिनी (नऊ ऑगस्ट) स्मारकाचे समारंभपूर्वक उद्घाटन करण्याचा, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रयत्न आहे.

हुतात्मा दामोदर हरी चापेकर, बाळकृष्ण हरी चापेकर, वासुदेव हरी चापेकर आणि महादेव गोविंद रानडे या क्रांतिवीरांचे पूर्णाकृती पुतळे उभारून त्यांचे समूहशिल्प चिंचवडगावात उभारण्यात येणार आहे. स्मारकाचे भूमिपूजन २५ ऑगस्ट २०१० रोजी झाले होते. मात्र, विविध टप्प्यांवर प्रकल्पाशी संबंधित कामे रखडल्याने प्रकल्पाचे काम पूर्ण होत नव्हते. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मिळण्यास बराच कालावधी गेला. तथापि, आता सर्व अडथळे दूर झाले असून जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता व ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मिळाले आहे. नाशिक येथे पुतळे तयार करण्याचे काम सुरू होते. ते पुतळे पालिकेच्या ताब्यात मिळाले आहेत. आता उद्घाटनाचा मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्रवादीचे अ‍ॅड. संदीप चिंचवडे व शिवसेनेच्या अश्विनी चिंचवडे हे नगरसेवक या प्रभागाचे प्रतिनिधित्व करतात. उद्घाटनासाठी अनुक्रमे अजित पवार तसेच उद्धव ठाकरे उपस्थित राहावेत, अशी त्यांची मागणी आहे. राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांना बोलावण्याचा, तसेच उद्घाटन सोहळा नऊ ऑगस्टला क्रांतिदिनी घेण्याचा स्मारक समितीचा विचार असून त्यादृष्टीने नियोजन सुरू झाले आहे. यानिमित्ताने तीन वेगवेगळ्या पक्षांचे प्रमुख नेते एका व्यासपीठावर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल.