नाटय़गृह प्रशासन हतबल
भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीसाठी चिंचवडच्या रामकृष्ण मोरे नाटय़गृहात टाकण्यात आलेले मंडप १५ दिवस तसेच ठेवण्यात आल्याने या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. ‘सत्ताधारी’ पक्षाच्या मंडळींचा हा उद्योग असल्याने, त्यांना कसे सांगायचे म्हणून नाटय़गृह प्रशासनही हतबल असल्याचे दिसून येते.
चिंचवड नाटय़गृहात २६ आणि २७ एप्रिलला प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसह राज्यभरातील भाजपचे बडे नेते या बैठकीला हजर होते. त्यासाठी बैठकीच्या चार दिवस आधी नाटय़गृहात सगळीकडे भव्य मंडप टाकण्यात आले होते. बैठक होऊन १५ दिवस झाले तरीही हे मंडप पूर्णपणे उतरवण्यात आलेले नाही. मंडपाचे लोखंडी खांब व अन्य साहित्य नाटय़गृहात पडून आहे. नाटय़गृहाच्या तळघरात आंबा महोत्सव सुरू आहे. त्याचप्रमाणे, नाटय़गृहात नाटक तसेच अन्य कार्यक्रमांसाठी मोठय़ा संख्येने नागरिक येतात. त्यांना या मंडपाचा खूप त्रास होतो आहे.
वाहने आत आणताना आणि बाहेर काढताना वाहनस्वारांना बरीच कसरत करावी लागते आहे. मात्र, त्याचे कोणालाही सोयरसुतक नसल्याचे दिसते. बैठकीच्या निमित्ताने भाजप नेत्यांनी कडेकोट बंदोबस्त लावला होता. भाजप पदाधिकाऱ्यांनी शिस्तीचे धडे पत्रकारांनाही दिले होते. बैठक संपल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून मंडप उतरवण्याचे काम सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, थोडे-थोडे साहित्य नेण्याचे काम सुरू आहे. उर्वरित साहित्य सांभाळण्याची जबाबदारी नाटय़गृहावर येऊन पडली आहे. भाजपचे आयोजिक पदाधिकारी नाटय़गृहाकडे फिरकत नसल्याने मंडपाचे खांब ‘जैसे थे’ आहेत. यासंदर्भात, कोणतेही भाष्य करण्यास नाटय़गृहातील अधिकारी तयार नाहीत. दरम्यान, ‘लोकसत्ता’ने याबाबतची माहिती घेण्यास सुरुवात केली आणि येथील छायाचित्रे काढल्यानंतर साहित्य हटविण्याचे काम सुरू करण्यात आले होते.