‘‘रुपी’सह राज्यातील वीस नागरी बँका अडचणीत असून ज्याप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती बँकांना मदत केली गेली तसे या अडचणीत असलेल्या नागरी बँकांना काही ‘पॅकेज’ देता येईल का, याचा विचार सुरू आहे,’ असे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

‘महाराष्ट्र सहकारी मुद्रणालया’तर्फे देण्यात येणारा ‘नामदार गोपाळ कृष्ण गोखले स्मृती आर्यभूषण पुरस्कार’ सहकार बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांना, तर ‘नरुभाऊ लिमये स्मृती आर्यभूषण पत्रकारिता पुरस्कार’ ज्येष्ठ पत्रकार मल्हार अरणकल्ले यांना बुधवारी चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, मुद्रणालयाचे संचालक अंकुश काकडे, अध्यक्ष अरविंद चव्हाण, उपाध्यक्ष विजय पाटील या वेळी उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले,‘‘साखर १९०० रुपयांपर्यंत खाली आली तरीही २२ हजार कोटी रुपयांची किमान आधारभूत किंमत सहकारी साखर कारखान्यांना देण्यात सरकारने सर्व प्रकारची मदत केली. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून २६०० कोटी रुपयांचे ‘सॉफ्ट लोन’ मिळवून दिले. सहकारी साखर कारखाने वाचले तरच सामान्य ऊस उत्पादकाला पैसे मिळणार आहेत. रुपी बँक कशी वाचेल याचाही आम्ही विचार केला. ‘रुपी’, ‘पेण अर्बन’, ‘सीकेपी’सह राज्यातील वीस नागरी बँका अडचणीत आहेत. त्यांना ‘पॅकेज’ देण्याचा विचार करत आहोत.

सहकारात सभासदाला प्रशिक्षित करणे महत्त्वाचे असल्याचे अनास्कर यांनी सांगितले.

‘रिझव्‍‌र्ह बँकेचा दृष्टिकोन निष्पक्ष हवा’

‘सहकार क्षेत्रातील बँका व पतसंस्था आणि व्यावसायिक खासगी बँका व राष्ट्रीयीकृत बँका यांच्याकडे पाहण्याचा रिझव्‍‌र्ह बँकेचा दृष्टिकोन फारसा निष्पक्ष (न्यूट्रल) नाही,’ असे मत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले. ते म्हणाले,‘‘राष्ट्रीयीकृत बँकांना तोटा झाल्यावर केंद्र सरकारी तिजोरीतून मदत करते. मग सहकार क्षेत्रातील बँकांना अशी मदत का होऊ नये?’’