उदरनिर्वाहासाठी चित्रपट संगीत, जुगलबंदी आणि फ्यूजन अशा विविध प्रांतामध्ये काम करतो. पण, हे करतानाही पारंपरिक संगीतावर आधारित माधुर्याने नटलेली स्वररचना असावी हा माझा कटाक्ष असतो. जुगलबंदी आणि फ्यूजन यामध्ये पैसा असला, तरी खरा आनंद शास्त्रीय संगीतामध्येच आहे, असे मत प्रसिद्ध बासरीवादक प्रवीण गोडखिंडी यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवातील अंतरंग उपक्रमांतर्गत श्रीनिवास जोशी यांनी गोडखिंडी यांच्याशी संवाद साधला. शास्त्रीय संगीताला सन्मान मिळवून देण्याची जबाबदारी कलाकारांची आहे. अभिजात संगीताची ही परंपरा अखंडित ठेवण्याचे काम युवा कलाकारांनी करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
जगभरामध्ये आणि सर्व संस्कृतीमध्ये आढळून येणारे बासरी हे एकमेव वाद्य आहे. शास्त्रीय संगीतापासून ते आधुनिक पाश्चात्त्य संगीतामध्ये सर्वत्र या वाद्याचा वापर केला जातो, असे सांगून गोडखिंडी म्हणाले, पं. पन्नालाल घोष यांनी बासरी या वाद्याला शास्त्रीय संगीतामध्ये स्थान मिळवून दिले. बासरीला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या पं. हरिप्रसाद चौरासिया यांच्या बासरीवादनातून आवाजाचा पोत, तंतकारी अंगाचा वापर आणि तबल्याच्या साथीने लयकारी ही वैशिष्टय़े जाणवतात. त्यांच्या वादनाचा आपल्यावर प्रभाव नाही असे म्हणणारा बासरीवादक खोटे बोलतो असेच म्हणावे लागेल. भारतीय संगीत हे हृदयातून येते. तर, कर्नाटक संगीतामध्ये गणिती क्रियांचा प्रभाव असल्याने मात्रांचे विभाजन करण्यावर भर आहे.
लहानपणापासून पं. भीमसेन जोशी यांचे गाणे ऐकत आलो. त्यांच्या गाण्याचा वडील व्यंकटेश गोडखिंडी यांच्यावरही प्रभाव होता. तू भीमसेनजी यांच्यासारखे बासरीतून गाण्याचा प्रयत्न कर, ही वडिलांची शिकवण मी वादनातून साकारण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यांनी अंगठय़ाच्या ठिकाणी  बासरीला नवे छिद्र आणले. त्यातून मींडचा नाद होतो. पंचम स्वराची निर्मिती करून आलापी आणि तान हे गायकी अंगाने वादनातून कशी येऊ शकेल यासंबंधीचे प्रयोग सुरू असल्याचेही गोडखिंडी यांनी सांगतानाच बासरीवादनाचे प्रात्यक्षिक दाखविले.

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे माजी विश्वस्त नानासाहेब देशपांडे यांचे छायाचित्र आर्य संगीत प्रसारक मंडळास शुक्रवारी प्रदान करण्यात आले. उस्ताद उस्मान खाँ यांच्या हस्ते कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी हे छायाचित्र स्वीकारले. शीला देशपांडे आणि डॉ. प्रभाकर देशपांडे या वेळी उपस्थित होते.
आर्य संगीत प्रसारक मंडळास
नानासाहेब देशपांडे यांची प्रतिमा
सवाई गंधर्व महोत्सव यशस्वी करण्यामध्ये स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांना मोलाची साथ देणारे डॉ. नानासाहेब देशपांडे यांचे छायाचित्र आर्य संगीत प्रसारक मंडळास शुक्रवारी देण्यात आले. ज्येष्ठ सतारवादक उस्ताद उस्मान खाँ यांच्या हस्ते मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी ही प्रतिमा स्वीकारली. नानासाहेबांचे चिरंजीव डॉ. प्रभाकर देशपांडे आणि स्नुषा शीला श्रीकांत देशपांडे या वेळी उपस्थित होत्या.
पं. भीमसेन जोशी आणि नानासाहेब हे सर्वार्थाने मित्र होते. पूर्वी शिष्य गुरूसमोर उभा राहत नसे. मग शंका विचारणे तर दूरचीच गोष्ट होती. अशा वेळी भीमसेनजी हे नानासाहेबांमार्फत सवाई गंधर्व यांना प्रश्न विचारत असत. नानासाहेब हे जावई असल्यामुळे सवाई गंधर्व यांनी त्यांच्या प्रश्नांना उत्तर दिले की मग भीमसेनजींच्या शंकांचे निरसन होत असे, अशी आठवण श्रीनिवास जोशी यांनी सांगितली. सवाई गंधर्व महोत्सवाला मोठे स्वरूप देण्यामध्ये भीमसेनजी यांच्यासमवेत नानासाहेबांचे मोठे योगदान आहे. पुण्यात आल्यानंतर संगीत विश्वात काम करताना मला नानासाहेबांचे प्रोत्साहन मिळाले, असे उस्ताद उस्मान खाँ यांनी सांगितले.
 बांसरी गुरु
बालपणी बासरी चोरून नेणारा मुलगा पुढे जगप्रसिद्ध बासरीवादक कसा झाला याची प्रेरणादायी कथा राजीव चौरासिया दिग्दर्शित ‘बांसरी गुरु’ या पं. हरिप्रसाद चौरासिया यांच्यावरील लघुपटातून उलगडली. श्रीकृष्णाची बासरी आज हरिजींच्या ओठांशी आणि श्वासाशी जोडली गेली आहे. १९६० मध्ये मुंबईत आल्यानंतर चित्रपटसृष्टीमध्ये गीतांमध्ये भरलेले बासरीचे रंग, पं. शिवकुमार शर्मा यांच्यासमवेत शिव-हरी नावाने दिलेले चित्रपट संगीत हा पट या लघुपटातून अनुभवता आला. संवादिनी हाती घेतलेल्या हरिपेक्षाही हातामध्ये बासरी असलेले पं. हरिप्रसाद चौरासिया पाहणे मला आवडेल, असे अभिनेते संजीवकुमार यांनी सांगितल्यानंतर केवळ शास्त्रीय संगीतावरच लक्ष केंद्रित केल्याचे चौरासिया यांनी कथन केले आहे. ‘सतार आणि सोरद या वाद्यांचे तंतकारी अंग बासरीवादनात आणणारे कलाकार’ या शब्दांत उस्ताद झाकिर हुसेन यांनी आणि बासरीला भाषा देणारे पंडितजी या शब्दांत पं. शिवकुमार शर्मा यांनी केलेले हरिजींचे वर्णन पडद्यावर पाहताना या कलाकाराचे मोठेपण श्रोत्यांना जाणवले.

Cyber cheater arrested from Madhya Pradesh who cheat music director
संगीत दिग्दर्शकाची सायबर फसवणूक करणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक, सायबर पोलिसांची कारवाई
freedom of artist marathi news
‘कलानंद’ हवा असेल तर ‘कलाकाराचं स्वातंत्र्य’ मान्य करता आलं पाहिजे…
suparna shyam play important role in new show
निलेश साबळेच्या नव्या शोमध्ये झळकणार ‘लग्नाची बेडी’ फेम अभिनेत्याची पत्नी! आजवर लोकप्रिय मालिकांमध्ये केलंय काम
prashant damle birthday special article
प्रशांत दामले : ‘बेस्ट’मध्ये नोकरी ते रंगभूमीचा ‘विक्रमादित्य’, व्यवहार कुशल निर्मात्याचा बहुरुपी प्रवास