‘स्वच्छ आणि हरित शहरा’साठी (क्लिन अँड ग्रीन इनिशिएटिव्ह) सिरम इन्स्टिटय़ूट आणि पूनावाला ग्रुपने पुढाकार घेतला असून त्यांच्यातर्फे शहराच्या मूलभूत विकास कामांसाठी शंभर कोटी रुपयांचे अर्थसाह्य़ लाभले आहे. खासगी आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या संयुक्त उपक्रमातून होणारा हा पहिलाच प्रकल्प असून घनकचरा व्यवस्थापन आणि आरोग्य या क्षेत्रासाठी या निधीचा विनीयोग केला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गुरुवारी या कामाचा शुभारंभ झाला.
‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत आदर पूनावाला क्लिन सिटी मूव्हमेंट आणि पुणे महानगरपालिका यांच्यातर्फे राबविण्यात येणाऱ्या संयुक्त प्रकल्पाचा शुभारंभ देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. पालकमंत्री गिरीश बापट, भाजप प्रवक्तया शायना एन. सी. महापालिका आयुक्त कुणाल कुमार, सिरम इन्स्टिटय़ूटचे प्रमुख डॉ. सायरस पूनावाला आणि आदर पूनावाला या वेळी उपस्थित होते. स्वच्छ आणि हरित पुण्यासाठी घनकचरा, आरोग्य आणि स्वच्छता अशा विविध प्रकल्पांमध्ये दोन ते तीन वर्षांमध्ये पूनावाला ग्रुप शंभर कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून आवश्यकता भासल्यास या निधीमध्ये वाढ करण्यात येणार असल्याचे आदर पूनावाला यांनी सांगितले.
सामाजिक संस्था, उद्योजक आणि नागरिकांनी सहयोग दिल्यास घनकचरा प्रक्रिया प्रकल्प प्रभावीपणे राबविणे सुलभ होऊन स्वच्छ भारत अभियान यशस्वी होईल, असे सांगत फडणवीस यांनी स्वच्छ भारत अभियानासाठी अन्य उद्योगसमूहांनी योगदान द्यावे, असे आवाहन केले. समाजाकडून आपण बरेच काही घेत असतो. त्याचप्रमाणे समाजाचे आपण देणे लागतो. आदर पूनावाला स्वच्छ शहर उपक्रम हा समाजाला परत देण्याच्या विचारातूनच पुढे आला आहे. शहराच्या विकासासाठी चांगले रस्ते, पर्यावरण, आरोग्य याबरोबरच सुरक्षा आणि स्वच्छता हे घटकदेखील महत्त्वाचे आहेत. हे ध्यानात घेऊन पूनावाला समूहाने पहिले आणि ठोस पाऊल उचलले आहे. त्याचे अनुकरण अन्य उद्योगसमूहांनी केल्यास त्यांच्या सहभागातून स्वच्छ भारत अभियानाची कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे. अन्य शहरांमध्येही असे उपक्रम विविध उद्योगसमूहांमार्फत राबविण्यात येतील, असेही फडणवीस यांनी सांगितले.
उद्योगांचे सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) या विषयी सातत्याने बोलले जाते. मात्र, पूनावाला ग्रुपने त्याचे अनुकरण करीत शहराच्या विकासामध्ये योगदान देण्यासाठी पाऊल उचलले असल्याचे कुणाल कुमार यांनी सांगितले. ‘सीएसआर’मध्ये गुंतवणूक करून झाल्यानंतर हा शंभर कोटी रुपयांचा निधी दिला जात असल्याचे सायरस पूनावाला यांनी सांगितले.
‘क्लिन सिटी मूव्हमेंट’ची वैशिष्टय़े
– शहरांतर्गत ३०० किलोमीटरचे रस्ते तीन वर्षांत स्वच्छ करण्याची मोहीम.
– तळेगाव येथील प्लांटमध्ये दरवर्षी एक लाख टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे नियोजन.
– एका वर्षांतील ओल्या कचऱ्याच्या विल्हेवाटीमुळे ५४२ टन कार्बन उत्सर्जन वाचणार.
– कचऱ्यावर शास्त्रीय आणि पर्यावरणस्नेही पद्धतीने प्रक्रिया केल्याने कचरा पुरण्यासाठीची १०९ एकर जागा मुक्त होणार.
संग्रहित लेख, दिनांक 8th Jan 2016 रोजी प्रकाशित
‘स्वच्छ आणि हरित शहरा’साठी पूनावालांतर्फे शंभर कोटी!
‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत आदर पूनावाला क्लिन सिटी मूव्हमेंट आणि पुणे महानगरपालिका यांच्यातर्फे राबविण्यात येणाऱ्या संयुक्त प्रकल्पाचा शुभारंभ देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 08-01-2016 at 03:34 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Clean and green poonawalla group