पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याविषयी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेला शब्द पाळला नाही, असे सांगत या संदर्भात सामूहिक लढा उभारण्याचा निर्धार शिवसेनेने केला आहे. ऐन अधिवेशनाच्या तोंडावर शहराच्या विविध ११ भागात जाहीर सभा होणार असून १० डिसेंबरला नागपूर अधिवेशनात विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत निर्णायक ठरणारा शहरातील अनधिकृत बांधकामाचा प्रश्न हिवाळी अधिवेशनात मांडला जाईल, असे दिसू लागताच त्यावरून राष्ट्रवादी व शिवसेनेत श्रेयाची लढाई सुरू झाली आहे. आम्ही पाठपुरावा केल्याने हा निर्णय होणार असल्याचे चित्र राष्ट्रवादीच्या आमदारांनी तयार केले असतानाच, आमच्या दबावामुळेच निर्णयाची परिस्थिती निर्माण झाल्याचे शिवसेनेने दाखवण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख श्रीरंग बारणे यांनी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची दिशा जाहीर केली. २१ नोव्हेंबर ते पाच डिसेंबपर्यंत दररोज सायंकाळी पाच वाजता चिखली, रूपीनगर, वाल्हेकरवाडी, डीलक्स चौक-पिंपरी, पाचपीर चौक-काळेवाडी, विकासनगर-किवळे, साई चौक-नवी सांगवी, सदगुरू कॉलनी-वाकड, दापोडी, थेरगाव, भोसरी या ठिकाणी सभा होणार आहेत. त्यानंतर नागपूरला मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आरक्षणावर झालेली वगळता अन्य बांधकामे नियमित करावीत, शास्तीकर रद्द करावा, शेतकऱ्यांना साडेबारा टक्के परतावा द्यावा, रेडझोनमधील राहत्या घरांना नागरी सुविधा पुरवाव्यात, अशा मागण्या बारणेंनी केल्या. पत्रकार परिषदेस खासदार गजानन बाबर उपस्थित नव्हते. त्यावरून बाबर व बारणे यांच्यात विसंवाद असल्याचे बोलले जाते. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष सदाशिव खाडे, पश्चिम महाराष्ट्राचे संघटक एकनाथ पवार, शिवसेनेच्या नगरसेविका सुलभा उबाळे आदी उपस्थित होते.