पुणे : राज्यातील ५४ महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांनी परत न नेलेली १४ कोटींची अनामत रक्कम पडून असल्याचे समोर आले आहे. करोना काळात विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणी निर्माण झालेल्या असल्याने आर्थिकदृष्टय़ा मागास विकास विद्यार्थ्यांसाठी या रकमेचा वापर करण्याची मागणी करण्यात येत आहे.

महाविद्यालयात प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना अनामत रक्कम भरावी लागते. महाविद्यालयातून बाहेर पडताना विद्यार्थ्यांनी ती रक्कम परत देणे अपेक्षित असते. कॉप्स विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अमर एकाड यांनी माहिती अधिकाराअंतर्गत राज्यातील वेगवेगळय़ा भागातील ५४ महाविद्यालयांत अर्ज करून अनामत रकमेची माहिती संकलित केली आहे. त्यानुसार संबंधित ५४ महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांनी परत न नेलेली १४ कोटी ३७ लाख ९४ हजार रुपयांची रक्कम पडून असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या पार्श्वभूमीवर एकाड म्हणाले, की शिल्लक अनामत रक्कम अनुदान निर्धारणाच्या वेळी उत्पन्नाची बाब म्हणून विचारात घेऊन ती वेतनेतर अनुदानातून वजा करून अनुदान अदा करण्यात येईल आणि शिल्लक अनामत रकमेचा तपशील वेतन देयक सादर करताना सादर करण्याचे परिपत्रक सहसंचालक विभागाने काढले होते. मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे राज्यातील महाविद्यालयांकडे पडून असलेल्या विद्यार्थ्यांच्या अनामत रकमेचा गैरवापर होऊ नये यासाठी आर्थिकदृष्टय़ा मागास विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी या रकमेचा करण्यात यावा. त्या संदर्भातील परिपत्रक उच्च शिक्षण विभागाने प्रसिद्ध करावे.