भोसरीतील शीतलबाग ते आदिनाथनगर दरम्यान पादचारी पुलाचे काम जाणीवपूर्वक रखडविले जात असून निविदा काढून दीड वर्ष झालं तरी ते काम सुरू होत नसल्याने आयुक्तांवर कोणाचा तरी दबाव आहे, असा आरोप नगरसेवक महेश लांडगे यांनी महापौर मोहिनी लांडे व आमदार विलास लांडे यांना उद्देशून स्थायी समितीत केला.
नवनाथ जगताप यांच्या अध्यक्षपदाच्या पहिल्याच बैठकीला आयुक्त अनुपस्थित होते, त्यामुळे सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आयुक्त नसल्यास अधिकारी खोटी उत्तरे देतात, अशी तक्रार करत सदस्यांनी आयुक्तांच्या उपस्थितीतच चर्चा करण्याची भूमिका घेतली. भोसरीतील पादचारी पुलाचे काम सुरू होत नसल्याच्या निषेधार्थ महेश लांडगे यांनी सभात्याग केला. त्याविषयी पत्रकार परिषदेत आयुक्तांच्या परस्परविरोधी कृतीकडे त्यांनी लक्ष वेधले. आयुक्त पाहणीसाठी आले असता रस्ता धोकादायक झाल्याचे सांगत त्यांनी तातडीने काम सुरू करण्याची भूमिका घेतली होती. मात्र, ते काम सुरूच झाले नाही. आता त्यांनी फेरनिविदा काढण्याचे आदेश दिले आहेत. तीन हजार विद्यार्थी तसेच महिला व वृध्दांसाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे. तेथे नेहमीच अपघात होतात. त्यामुळे तातडीने पादचारी मार्ग करण्याची गरज आहे. मात्र, सातत्याने पाठपुरावा करूनही काम सुरू होत नसल्याने आयुक्तांवर कोणाचा तरी दबाव असल्याचा संशय लांडगे यांनी व्यक्त केला. याशिवाय, एका आजारी कर्मचाऱ्याच्या बदलीचे काम आपण सांगितले तेव्हा आयुक्तांनी नियमावर बोट ठेवले. मात्र, तेच काम भोसरीतील एका नेत्याने सांगताच तातडीने केले, हा आयुक्तांचा दुजाभाव आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली.