दत्ता जाधव

पुणे : केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या पुढाकाराने सुमारे ७०० कोटी रुपयांची गुंतवणूक करून राज्यात नाशिक येथे द्राक्षासाठी, तर सोलापूर येथे डाळिंबासाठी समूह विकास योजना (क्लस्टर) अमलात आणली जाणार आहे. पीक व्यवस्थापन ते निर्यातीपर्यंतच्या सुविधा एकाच छताखाली उभारण्याच्या या योजनेला आता राज्य सरकारकडून गती देण्यात आली असून, १९ जूनपर्यंत या बाबत विविध संस्थांनी प्रकल्प आराखडय़ासह सविस्तर प्रस्ताव दाखल करावयाचे आहेत.

राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ या योजनेला आर्थिक मदत देणार असून एकूण अंमलबजावणीवर नियंत्रण ठेवणार आहे. महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळाला या योजनेसाठी समूह विकास संस्था म्हणून म्हणून निवडण्यात आले आहे. शिवाय क्लस्टरच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर विकास समितीची स्थापना करण्यात आली आहे.

 देशांतर्गत बाजारपेठेत आणि निर्यात बाजारपेठेत स्पर्धात्मकता वाढविणे, पीक लागवड, पीक संरक्षण, शेतकरी प्रशिक्षण, काढणी पश्चात तंत्रज्ञान, मूल्यवर्धन, वाहतूक, विपणन, निर्यात आणि प्रसिद्धी आदी सर्व सोयी एकाच छताखाली मिळाव्यात यासाठी या समूह विकास योजनेचा उपयोग होणार आहे.

एकूण जागतिक फळ आणि पालेभाज्यांच्या बाजारात भारताच्या फळांचा १.७ टक्के आणि भाजीपाल्यांचा वाटा ०.५ टक्के इतका अत्यल्प राहिला आहे. हे चित्र बदलण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे.

थोडी माहिती..

भारत फळे आणि भाजीपाला पिकांचा जगातील सर्वात मोठा उत्पादक देश आहे. जागतिक फळे आणि भाजीपाला क्षेत्रात भारताचा वाटा दहा टक्के आहे. २०१९-२० या वर्षांत देशात २५.६६ लाख हेक्टर क्षेत्रावर फळे आणि भाजीपाल्यांची लागवड होऊन ३२०.७७ लाख टन इतके आजवरचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. 

प्रतिक्रिया

राज्यातून द्राक्षे आणि डाळिंबांची चांगली निर्यात होते. या निर्यातीत मोठी वाढ व्हावी, शेतकऱ्यांना निर्यातक्षम फळपिकांच्या उत्पादनासाठी, पीक संरक्षण, काढणी पश्चात तंत्रज्ञानाबाबत योग्य आणि वेळेत मार्गदर्शन मिळावे, सर्व सुविधा एकाच छताखाली मिळाव्यात यासाठी क्लस्टर महत्त्वाचे ठरेल.

– डॉ. कैलास मोते, संचालक, फलोत्पादन

झाले काय?  नाशिक येथे होणाऱ्या द्राक्षाच्या मेगा क्लस्टरसाठी ४०५ कोटी ६५ लाख आणि सोलापूर येथे होणाऱ्या डाळिंबाच्या क्लस्टरसाठी २७८ कोटी ७२ लाख रुपयांच्या गुंतवणुकीला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.

मूळ उद्देश..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जागतिक बाजारपेठेत भारतीय फळे आणि भाजीपाल्यांचा वाटा वाढावा, जागतिक स्पर्धेत येथील शेतकरी, निर्यातदारांना संधी मिळावी म्हणून देशभरात विविध फळपिकांसाठी १२ क्लस्टर होणार असून, त्यातील दोन क्लस्टर राज्यात होणार आहेत. नाशिकच्या द्राक्ष उत्पादक, तर सोलापूर परिसरातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.