एमसीसीआयएच्या सर्वेक्षणातील निष्कर्षपुणे :
करोना प्रतिबंधात्मक निर्बंध गेल्या काही महिन्यांत शिथिल झाल्याने, सणासुदीमुळे बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण असताना उद्योग क्षेत्रातही नवी ऊर्जा निर्माण झाली आहे. पुणे आणि परिसरातील कंपन्यांनी ऑक्टोबरमध्ये उत्पादनाची आणि कार्यरत मनुष्यबळाची करोनापूर्व पातळी गाठली असून, उत्पादन आणि कार्यरत मनुष्यबळाची पातळी एप्रिल २०२० नंतर पहिल्यांदाच ९० टक्क्यांवर पोहोचली आहे.
मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरने (एमसीसीआयए) सर्वेक्षण मालिकेतील १९ व्या मासिक सर्वेक्षणाचे निष्कर्ष मंगळवारी जाहीर केले. या सर्वेक्षणात पुणे आणि परिसरातील दीडशेहून अधिक कंपन्यांनी सहभाग नोंदवला. करोनाच्या प्रादुर्भावामुळे पुणे आणि परिसरातील कंपन्यांचे कामकाज आणि उत्पादन विस्कळीत झाले होते.
जूनपासून निर्बंध शिथिल होऊ लागल्यावर उत्पादन पातळी, कार्यरत मनुष्यबळात वाढ होऊ लागली. त्यात गेल्या दीड वर्षांतील सर्वाधिक उत्पादन पातळी सप्टेंबरमध्ये गाठली गेली होती. तर सप्टेंबरमध्ये ८८ टक्के असलेली उत्पादन पातळी ऑक्टोबरमध्ये ९० टक्के झाली, तर सप्टेंबरमध्ये ८७ टक्के असलेले कार्यरत मनुष्यबळ ऑक्टोबरमध्ये ९१ टक्क्यांपर्यंत वाढल्याचे ऑक्टोबरच्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले.
सर्वेक्षणात सहभागी झालेल्या कंपन्यांपैकी ४३ टक्के कंपन्यांनी करोनापूर्व काळातील उत्पादन पातळी गाठल्याची माहिती दिली. तर करोना पूर्व काळातील उत्पादने गाठण्यासाठी ५२ टक्के कंपन्यांना सहा महिने लागतील असे वाटते. तर ५ टक्के कंपन्यांनी सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागण्याचा अंदाज व्यक्त केला. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या कंपन्यांमध्ये १५ टक्के सूक्ष्म, २१ टक्के लघु, २४ टक्के मध्यम आणि ४० टक्के मोठय़ा उद्योग क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश आहे. तसेच या कंपन्यांपैकी ७० टक्के कंपन्या उत्पादन क्षेत्रातील, ११ टक्के कंपन्या सेवा क्षेत्रातील, उर्वरित १९ टक्के कंपन्या उत्पादन आणि सेवा या दोन्ही क्षेत्रांतील आहेत.
सणासुदीचा काळ पुणे परिसरातील अर्थव्यवस्थेसाठी नवा उत्साह घेऊन आला आहे. या काळात परिस्थिती पूर्वपदावर येण्याचा कल सुरूच राहिला आहे. एप्रिल २०२० नंतर पहिल्यांदाच संघटित आणि असंघटित एमएसएमई क्षेत्रातील उद्योग आणि सेवांनी ९० टक्क्यांची पातळी गाठली आहे.
– सुधीर मेहता, अध्यक्ष, एमसीसीआयए
सुमारे ५० टक्के कंपन्या करोनापूर्व काळातील उत्पादन पातळीपर्यंत किंवा त्याहून अधिक उत्पादन पातळीवर पोहोचल्या आहेत, तर उर्वरित कंपन्या चालू आर्थिक वर्षांच्या अखेपर्यंत ती पातळी गाठतील. एकूणात उद्योगांचे उत्पादन वाढत असतानाच उत्पादनांना मागणीही वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अतिशय उत्साहवर्धक असे हे चित्र आहे.
– प्रशांत गिरबने, महासंचालक, एमसीसीआयए