पुणे : टिळक रस्ता येथील न्यू इंग्लिश स्कू लमधील तारांगणाद्वारे होणाऱ्या अभ्यास वर्गाअंतर्गत ‘दररोज एक प्रश्न खगोलशास्त्राचा’ या अनोख्या उपक्रमाने एक हजार दिवसांचा टप्पा गाठला आहे. विशेष म्हणजे, व्हॉट्सअ‍ॅपद्वारे हा उपक्रम सुरू असून, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना खगोलशास्त्राची गोडी लागण्यास मदत झाली आहे.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) जगन्नाथ राठी व्होकेशनल गायडन्स अँड ट्रेनिंग इन्स्टिटय़ूटतर्फे  आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांसाठी गेली आठ वर्षे खगोलशास्त्राचे अभ्यासवर्ग घेतले जातात. दर महिन्याला दोन व्याख्याने, निरीक्षण आणि कृती अशा पद्धतीने हा अभ्यास वर्ग चालतो. अभ्यास वर्गातील विद्यार्थ्यांशी संपर्क ठेवण्यासाठी ऑक्टोबर २०१८ पासून विभाग प्रमुख विनायक रामदासी दररोज संध्याकाळी सात वाजता अभ्यास वर्गाच्या व्हॉट्सअ‍ॅप समूहावर एक वस्तुनिष्ठ  प्रश्न पाठवतात. विद्यार्थी त्या प्रश्नाची व्हॉट्सअ‍ॅपद्वारेच उत्तरे देतात अशा प्रकारे उपक्रम चालतो.

उपक्रमाविषयी रामदासी म्हणाले, की ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे मामा दररोज फळ्यावर एक गणित लिहून ठेवत आणि नारळीकर त्याचे उत्तर सोडवत. एका कार्यक्रमात ही आठवण डॉ. नारळीकर यांनी सांगितली होती. त्यापासून प्रेरणा घेऊन हा उपक्रम सुरू झाला. प्रत्येक वर्षी ५० ते ८० मुलांचा उपक्रमात सहभाग असतो. त्यामुळे एकू ण दोनशे मुले उपक्रमाचा भाग आहेत. उपक्रमाला एक वर्ष पूर्ण झाल्यावर डॉ. नारळीकर यांनी मुलांशी आयुकामध्ये संवाद साधला होता. करोना काळात अभ्यासवर्ग प्राधान्याने ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे.  या उपक्रमाअंतर्गत विचारण्यात आलेले प्रश्न मराठी आणि इंग्रजी या दोन भाषांतील होते. आता या प्रश्नांचे सचित्र पुस्तक प्रकाशित करण्याचा प्रयत्न आहे.

खगोलशास्त्रात अनेक संधी

उपक्रमाला एक हजार दिवस झाल्यानिमित्ताने ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरविंद रानडे यांचे ऑनलाइन व्याख्यान झाले. त्यात विद्यार्थ्यांसह डीईएसचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. जेआरव्हीजीटीआयचे संचालक प्रशांत गोखले, तारांगणाचे विभाग प्रमुख विनायक रामदासी आदी सहभागी झाले होते. ‘खगोलविज्ञानातील अद्याप न सुटलेली कोडी सोडवण्यासाठी मिशन आदित्य ही भारताची मोहीम महत्त्वाची ठरणार आहे. या योजनेमुळे भरपूर माहिती उपलब्ध होणार असल्याने या क्षेत्रात निर्माण होणाऱ्या अनेक संधींचा विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा,’ असे डॉ. रानडे यांनी सांगितले.