एलबीटीच्या विरोधात आंदोलन सुरू झाल्यानंतर मोठय़ा व्यापाऱ्यांनी छोटय़ा व्यावसायिकांवर दबाव आणल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. आता व्यापाऱ्यांनी सोमवारपासून (२२ एप्रिल) पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे सक्तीने दुकाने बंद करण्याचा प्रयत्न झाल्यास त्यांचा बंदोबस्त करण्यात येईल, कोणीही असले तरी त्याची गय केली जाणार नाही, असे पोलीस उपायुक्त शहाजी उमप यांनी स्पष्ट केले आहे.
सोमवारपासून व्यापाऱ्यांनी पुन्हा आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. मात्र, व्यापाऱ्यांच्या कोणत्याही रॅलीला, पदयात्रेला पोलिसांकडून परवानगी दिली जाणार नाही. ज्यांना दुकाने सुरू ठेवायची असतील त्यांना पूर्ण मुभा आहे. कोणाच्या दबावामुळे दुकाने बंद ठेवण्याचे काही कारण नाही. सक्ती करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. नागरिकांनी पोलिसांकडे तक्रारी द्याव्यात. शहरातील १८ मॉलला पोलीस संरक्षण दिले जाणार आहे. व्यापाऱ्यांनी मागणी केल्यास पोलीस संरक्षण दिले जाणार आहे. याशिवाय, दुकाने सुरू ठेवू इच्छिणाऱ्या व्यावसायिकांनाही संरक्षण देण्याचा प्रयत्न करू. सर्वाना पुरेल इतका बंदोबस्त देणे शक्य नसले तरी पुरेसे संरक्षण देऊ. दुकाने सक्तीने बंद करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेतले जाईल व फौजदारी कारवाई करण्यात येईल. खासदार गजानन बाबर व्यापाऱ्यांचे नेतृत्व करत असले तरी त्यांनाही कायदे नियम आहेत, याकडे उमप यांनी लक्ष वेधले आहे.