पिंपरी : हिंजवडी आयटी पार्कमधील एका कंपनीचे गोपनीय सोर्स कोड आणि सॉफ्टवेअर सोल्यूशन चोरून नवीन कंपनी स्थापन करून ८२ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना एप्रिल २०२४ पासून ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत घडली. याप्रकरणी ४५ वर्षीय व्यक्तीने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून कंपनीसोबत केलेल्या कराराचा भंग केला. फिर्यादीच्या कंपनीतील गोपनीय आणि कॉपीराईट संरक्षित सोर्स कोड व सॉफ्टवेअर सोल्यूशनची चोरी केली. तसेच शंभर बेकायदेशीरपणे विकसित केलेल्या वेबसाइटचा मोबदला, अपॉर्च्युनिटी लॉस आणि इतर सेवांच्या माध्यमातून कंपनीचे अंदाजे ८२ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान केले आहे. आरोपींनी नवीन कंपनी स्थापन करून स्वतःच्या फायद्यासाठी फिर्यादीच्या कंपनीतील सॉफ्टवेअर सोल्यूशन आणि सोर्स कोडचा वापर केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सायबर पोलीस तपास करत आहेत.

चाकण एमआयडीसीतील कंपनीतील कर्मचाऱ्याचा ई-मेल हॅक, दीड कोटीची फसवणूक

चाकण औद्योगिक पट्ट्यातील एका कंपनीतील कर्मचाऱ्याचा अज्ञात व्यक्तीने ई-मेल आयडी हॅक करून व्हेंडरची माहिती चोरली. बनावट माहिती शेअर करून बँक खात्याची माहिती पुरवून कंपनीची एक लाख ५९ हजार ६० अमेरिकन डॉलर म्हणजेच अंदाजे एक कोटी ३९ कोटी रुपयांची फसवणूक केली. ही घटना २ एप्रिल ते १३ मे २०२५ दरम्यान घडली आहे. याप्रकरणी एका महिलेने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्ती आणि बनावट बँक खातेधारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने चाकणमधील एका कंपनीतील कर्मचाऱ्याचा ईमेल आयडी हॅक करून, व्हेंडरची माहिती चोरली. त्याने बनावट बँक खात्याची माहिती ईमेलद्वारे पुरवली आणि इनबॉक्समधील तसेच डिलीट केलेल्या ई-मेलची चोरी केली. या आधारावर, व्हेंडरशी साधर्म्य असलेल्या बनावट डोमेन आणि ईमेल आयडीचा वापर करून बँक खात्याची माहिती बदलली. जेव्हा कंपनीच्या अकाउंट पेएबल टीमने या बनावट खात्यावर पेमेंट सुरू केले, तेव्हा अज्ञात व्यक्तीने स्वतःसाठी रक्कम घेऊन कंपनीची एक लाख ५९ हजार ६० अमेरिकन डॉलर (भारतीय रुपयांमध्ये एक कोटी ३९ लाख रुपये) ची आर्थिक फसवणूक केली. सायबर पोलीस तपास करत आहेत.

चाकणमध्ये कंपनीत मशिनचा पार्ट अंगावर पडल्याने कामगाराचा मृत्यू

कामगारांना आवश्यक सुरक्षा साधने न पुरवता आणि बिघाड असलेली मशिनरी सुरू ठेवल्याने मशिनचा पार्ट अंगावर पडून एका कामगाराचा मृत्यू झाला, तर इतर दोन कामगार गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी चाकण येथील एका कंपनीत घडली.

डुलशेलू दुसार (५६) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी जितेंद्रकुमार डुलशेलू दुसार पासवान (२५, नाणेकरवाडी, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पर्यवेक्षक योगेश सूर्यभान भुसारे (३०, आंबेठाण चौक, चाकण) याला अटक केली आहे. तसेच ठेकेदार विरोधातही गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ठेकेदाराने कामगारांना हेल्मेट किंवा इतर कोणतीही सुरक्षा साधने दिली नाहीत. तसेच पर्यवेक्षक भुसारे याने मशिनमध्ये बिघाड असल्याची जाणीव असूनही, काम सुरू ठेवले. यामुळे काम सुरू असताना मशिनची ट्रॉली डुलशेलू यांच्या डोक्यात पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत श्रेयस हनुमंत भगत आणि राज निषाद हे दोन कामगारही जखमी झाले आहेत. चाकण पोलीस तपास करत आहेत.

टाटा मोटर्स कंपनीतून मटेरियलची चोरी, तिघांना अटक

टाटा मोटर्स कंपनीच्या पिंपरी येथील एच ब्लॉक फेब्रिकेशन यार्डमधून पाच लाख पाच हजार रुपये किमतीचे मटेरियल चोरून त्याचा अपहार केल्याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही घटना २६ जुलै ते २९ जुलै या कालावधीत टाटा मोटर्स कंपनीत घडली आहे.

याप्रकरणी दीपू श्रीकेशन सिंह (३५, शाहूनगर, चिंचवड) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी कमलेश त्रिभुवन निषाद (२९, शाहूनगर, चिंचवड), दीपक भाईराम लेवा (३४, संभाजीनगर, चिंचवड) आणि उमरफारुख राजुद्दीन शेख (नेहरूनगर, पिंपरी) यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे टाटा मोटर्स कंपनीत काम करतात. त्यांनी संगनमत करून कंपनीतील पाच लाख पाच हजार रुपये किमतीचे मटेरियल ट्रकमध्ये भरले. हे मटेरियल टाटा मोटर्सच्या मावळ येथील प्लँटमध्ये घेऊन जाण्याऐवजी, आरोपींनी त्याचा परस्पर अपहार करून कंपनीचा विश्वासघात केला आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.