scorecardresearch

शिरूरच्या काँग्रेस नगरसेवकाचा खून; पाच जणांना अटक

शिरूर परिसरात तणाव निर्माण झाला असून मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.

शिरूरच्या काँग्रेस नगरसेवकाचा खून; पाच जणांना अटक
रविवारी भरदिवसा बाजारपेठेत तीक्ष्ण शस्त्राने महेंद्र मल्लाव यांचा खून करण्यात आला होता.

शिरूरमधील काँग्रेसचे नगरसेवक महेंद्र हिरामण मल्लाव (वय ४८) यांचा खून केल्याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. पाचही संशयित शिरूर येथील आहेत. रविवारी भरदिवसा बाजारपेठेत तीक्ष्ण शस्त्राने मल्लाव यांचा खून करण्यात आला होता. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी शिरूर पोलीस ठाण्यावर दगडफेक केली. त्यामुळे शिरूर परिसरात तणाव निर्माण झाला असून मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.
शिरूरमधील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब काळे यांचे रविवारी निधन झाले. दुचाकीस्वार महेंद्र मल्लाव रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास अमरधाम स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी निघाले होते. बाजारपेठेत दुचाकीस्वार हल्लेखोरांनी मल्लाव यांना अडविले. हल्लेखोरांकडे कोयते होते. मल्लाव यांच्यावर कोयत्याने वार करून हल्लेखोर पसार झाले. रविवार असल्याने बाजारपेठेत गर्दी होती. शेकडो नागरिकांच्या डोळ्यादेखत मल्लाव यांच्यावर हल्ला झाल्याने घबराट उडाली. दुकानदारांनी तातडीने दुकाने बंद केली. दरम्यान, हल्लेखोर तेथून पसार झाले. मल्लाव यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच ते मरण पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
मल्लाव यांचा भरदिवसा खून झाल्यानंतर ग्रामस्थ संतप्त झाले. त्यांनी पोलीस ठाण्यावर दगडफेक केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी नजीकच्या शिक्रापूर, रांजणगाव पोलीस ठाण्यातून अतिरिक्त कुमक मागविली. राज्य राखीव दलाच्या दोन तुकडय़ा शिरूर गावात तैनात करण्यात आल्या.हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत. मल्लाव यांचा मुलगा शंतनू याला काही महिन्यांपूर्वी एका तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक केली होती. सध्या तो येरवडा कारागृहात आहे. पीडित मुलीचे कुटुंबीय व मल्लाव यांच्यात वाद होता. या कारणावरून मल्लाव यांचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-08-2016 at 12:29 IST

संबंधित बातम्या