पुणे : वाढत्या महागाईविरोधात अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या वतीने जनजागर अभियानाला प्रारंभ झाला असून याअंतर्गत काँग्रेसकडून फेरी काढण्यात आली. पेट्रोल, डिझेल, घरगुती सििलडरच्या भाववाढीमुळे त्रस्त झालेल्या जनतेचे छायाचित्रांचे फलक घेऊन, मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देत काँग्रेस कार्यकर्ते मोठय़ा संख्येने या फेरीमध्ये सहभागी झाले होते.

शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. अभय छाजेड, माजी आमदार दीप्ती चवधरी, दत्ता बहिरट, वीरेंद्र किराड यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.  रमेश बागवे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या राजवटीत सामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे.

जीवनावश्यक वस्तूंचे भाव दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. सरकारी संस्थांचे भाजप सरकार खासगीकरण करीत असून त्यामुळे अनेकांच्या रोजगारावर गदा आली आहे. देशात बेरोजगारी वाढत आहे. आगामी पंधरा दिवसांत शहराच्या विविध वॉर्डात प्रभात फेरी आणि कोपरा सभा घेतली जाईल.