पुणे : ‘मतचोरीसंदर्भात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला काही प्रश्न विचारले आहेत. त्याला उत्तर देण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. मात्र, आयोगाऐवजी देवेंद्र फडणवीस त्यासंदर्भात प्रतिक्रिया देत असतील तर, त्यांना हा अधिकार कोणी दिला? फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत, की आयोगाचे निवडणूक आयुक्त आहेत,’ अशी विचारणा काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी येथे मंगळवारी केली.
काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या खडकवासला येथील दोन दिवसीय कार्यशाळेचा समारोप मंगळवारी झाला. त्या वेळी पत्रकार परिषदेत बोलताना चेन्नीथला यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधानसभेतील काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, डाॅ. विश्वजित कदम, नितीन राऊत, नसीम खान, राज्य प्रवक्ते अतुल लोंढे आणि खजिनदार ॲड. अभय छाजेड या वेळी उपस्थित होते.
‘उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणे हा त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे. राज ठाकरे अद्यापही महाविकास आघाडीत नाहीत. ठाकरे बंधू एकत्र येण्याचा निर्णय झाल्यानंतर महाविकास आघाडीतील राज यांच्याबाबत काँग्रेस चर्चा करून निर्णय घेईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढविण्यासंदर्भात चर्चा सुरू झाली आहे. मात्र, अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही,’ असे चेन्नीथला यांनी स्पष्ट केले.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यामुळे देशातील लोकशाहीची हत्या होत आहे. त्यामुळे कोणत्याही निवडणुका मुक्त वातावरणात होत नाहीत. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळाल्या. मात्र, त्यानंतर सहा महिन्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वांसमोर आहे. राज्यातील महायुतीचे सरकार जनतेने निवडून दिलेले नाही, तर निवडणूक आयोगाच्या कृपेने आलेले सरकार आहे. हरियाणातही हाच प्रकार झाला. तसाच प्रकार बिहार निवडणुकीतही होण्याची शक्यता आहे,’ अशी टीका त्यांनी केली.
चेन्नीथला म्हणाले, ‘मतचोरीसंदर्भातील अनेक पुरावे आणि उदाहरणे आम्ही आयोगाला दिली आहेत. मात्र कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे लोकशाही वाचविण्यासाठी राहुल गांधी प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांना उत्तर देण्याऐवजी निवडणूक आयोगाकडून नोटीस दिली जात आहे.’
‘शेतकरी कर्जमाफी कधी?’
‘शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली, पण ती कधी अमलात आणणार हे सांगितले नाही. लाडक्या बहिणींना वेळेवर पैसे मिळत नाहीत. तर, गृहराज्यमंत्री डान्सबार चालवित असून, कृषिमंत्री सभागृहात रमी खेळतात. सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. सरकारविरोधी वातावरण असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही घेण्यास चालढकल सुरू आहे,’ अशीही टीका रमेश चेन्नीथला यांनी केली. तसेच, ‘काँग्रेसच्या सत्ताकाळात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून कधीही धमक्या मिळाल्या नाहीत,’ असेही त्यांनी सांगितले.