पिंपरीत काँग्रेस-राष्ट्रवादीत तिढा; ताकदीनुसार जागावाटपाचा काँग्रेसला फटका
पिंपरी पालिकेच्या राजकारणात राष्ट्रवादी वरचढ असून काँग्रेसची स्थिती कमकुवत आहे. भाजप-शिवसेनेची युती झाल्यास काँग्रेस-राष्ट्रवादीला आघाडी करावी लागणार आहे. मात्र, प्रत्यक्ष जागावाटपाची चर्चा सुरू होण्यापूर्वीच पक्षाचे ९३ व काँग्रेसकडून आलेले सात नगरसेवक मिळून १०० जागांवर दावा करण्याचे सूतोवाच राष्ट्रवादीने केले असून अन्य समविचारी पक्षांशीही बोलणी सुरू केली आहे. ताकदीनुसार जागावाटप होणार असल्याचे सांगत ‘राष्ट्रीय पक्ष’ असलेल्या काँग्रेसच्या वाटय़ाला जेमतेम दहा जागा सोडण्याच्या हालचाली दिसू लागल्याने ४० जागांची अपेक्षा असलेल्या काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
पिंपरी पालिकेच्या २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे ८३ नगरसेवक चिन्हावर निवडून आले. अपक्ष आलेले काही नगरसेवकही नंतर राष्ट्रवादीशी सलग्न झाले. काही दिवसांपूर्वी, सात नगरसेवकांचा एक गट राष्ट्रवादीला येऊन मिळाला. हा संदर्भ देत, आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादीकडून १०० जागांवर दावा करण्यात येत आहे. उर्वरित २८ जागांमध्ये काँग्रेस व अन्य समविचारी पक्षांच्या जागांचा विचार होणार असल्याचे सांगण्यात येते.
काँग्रेसचे १४ नगरसेवक निवडून आले होते. मात्र, सद्य:स्थितीत केवळ दोन नगरसेवक पक्षात राहिले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीकडून काँग्रेसला फारसा ‘सन्मानजनक’ प्रस्ताव दिला जाईल, अशी शक्यता नाही. काँग्रेसला ४० जागांची अपेक्षा असून राष्ट्रवादी त्याचा विचारही करणार नाही, असे दिसते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीकडून काँग्रेसला अवघ्या १० जागा देण्याचा विचार सुरू आहे.
काँग्रेसला ठरावीक दोन पॅनेलच्या संपूर्ण चारही जागा हव्या आहेत. राष्ट्रवादी त्यास अनुकूल नाही. २०१२ मध्ये काँग्रेसच्या ज्या १४ जागा निवडून आल्या, त्या सर्व जागांवर काँग्रेसचा दावा आहे. तोही राष्ट्रवादीला मान्य नाही. कारण, त्यातील बहुतांश नगरसेवक राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना पक्षाची मानहानी होईल, असा राष्ट्रवादीचा प्रस्ताव अमान्य आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेसशी आघाडी करण्यास अनुकूलता दाखवली आहे. मात्र, ताकदीनुसार जागावाटप झाली पाहिजे, असे यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
अशा परिस्थितीत, दोन्ही काँग्रेसमध्ये जागावाटपाचा तिढा आहे. आघाडी करण्यास आम्ही सकारात्मक आहोत, असे दोन्ही काँग्रेसकडून सांगण्यात येत असले, तरी प्रत्यक्ष चर्चेला मात्र अद्याप सुरुवात झालेली नाही.
युती नाही तर आघाडीही नाही
भाजप-शिवसेनेत युती झाली नाही, तरीही काँग्रेस-राष्ट्रवादीत आघाडी करण्यात येणार, असे अजित पवार यांनी निक्षून सांगितले आहे. मात्र, युती न झाल्यास आघाडीही न होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.