काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मणिकराव ठाकरे यांचे समर्थक मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या राजीनाम्याबाबत आक्रमक झाले असून, पुण्यात ठाकरे समर्थक नगरसेवक दीपक मानकर यांनी रविवारी जाहीरपणे ही मागणी केली. या मागणीनंतर पिंपरी महापालिकेतील विरोधी पक्षनेते विनोद नढे यांनीसुद्धा ‘पिंपपरीतही उद्रेक होऊ शकतो, कार्यकर्त्यांना गृहीत धरू नये,’ असा इशारा दिला. मात्र, इतर काँग्रेसजनांकडून या मागणीला पाठिंबा मिळाला नाही.
लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला आहे. पुण्यातही त्याचा प्रत्यय पाहायला मिळाला. पुण्यातील काँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मानकर यांनी अचानक मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आणि ते पुण्यात आले तर आंदोलन करू, असा इशारा दिला. ‘‘पुण्याचे प्रश्न घेऊन आम्ही सातत्याने मुख्यमंत्र्यांकडे गेलो. त्यांना निवेदने दिली. २००० सालापर्यंतच्या झोपडपट्टय़ांना मान्यता देण्याचा प्रश्न असो किंवा युवा वर्ग, विद्यार्थ्यांचे प्रश्न असोत. मुख्यमंत्री केवळ ‘हो’ म्हणत राहिले पण त्यांनी कशाचीच अंमलबजावणी केली नाही. या निवडणुकीत मोदींचा प्रभाव होताच, पण काँग्रेसने सर्वसामान्यांची कामे केली असती तर परिवर्तन दिसले असते. पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा,’’ असे मानकर म्हणाले. मात्र, त्यांना इतर नेत्यांचा पाठिंबा मिळाला नाही.
दरम्यान, पिंपरी-चिंचवडमध्येही विरोधी पक्षनेते नढे यांनी अशीच भूमिका घेतली. पिंपरी-चिंचवडचे काँग्रेस शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर हे माणिकराव ठाकरेसमर्थक आहेत, तर नढे हे भोईर यांचे समर्थक आहेत. शहरातील विविध प्रश्नांबाबत पाठपुरावा करूनही मुख्यमंत्री प्रतिसाद देत नाही, अशी पदाधिकाऱ्यांची तक्रार आहे. नढे म्हणाले, अनधिकृत बांधकामे व शास्तीकराचा प्रश्न महत्त्वाचा आहे. मात्र, आमचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून प्राधिकरण समिती रिक्त आहे, त्याचा निर्णय होत नाही. लोकसभा निवडणुकांमध्ये झालेले पानपिंत विधानसभा निवडणुकांमध्ये होऊ नये, असे वाटत असेल तर नागरिकांशी संबंधित प्रश्नांचे निर्णय तातडीने होणे गरजेचे आहे. कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना गृहीत धरता कामा नये, असे ते म्हणाले.
भोईर यांच्या कार्यपद्धतीविषयी मुख्यमंत्री नाराज असल्याचे सांगितले जाते. माणिकरावांशी सुरू असलेल्या शीतयुद्धामुळे मुख्यमंत्री पिंपरीत लक्ष देत नसल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे. भोइरांच्या पुढाकाराने शहर काँग्रेसने जनजागरण रथयात्रा केली, त्याचा आरंभ माणिकरावांच्या हस्ते झाला. समारोपासाठी मुख्यमंत्र्यांनी यावे, यासाठी खूप प्रयत्न झाले. नेहरूनगर येथे जाहीर सभेचे नियोजनही झाले. तथापि, मुख्यमंत्र्यांनी वेळ न दिल्याने पदाधिकारी तीव्र नाराज झाले होते.