पिंपरी : पिंपरी पालिकेच्या वतीने प्लास्टिकचा वापर करणारे नागरिक तथा व्यापाऱ्यांच्या विरोधात धडक कारवाई मोहीम सुरू करण्यात आली आहे. या कारवाईवरून शहरात जागोजागी वादाचे प्रसंग निर्माण होऊ लागले आहेत. महापालिकेची कारवाई पथके मनमानी पद्धतीने दंड आकारणी करतात, असा आरोप होत आहे. व्यापाऱ्यांना विश्वासात घ्या, वादावादाची परिस्थिती निर्माण करू नका, असे आवाहन करत भाजपने अशा मनमानी कारवाईला विरोधाची भूमिका घेतली आहे.  

पालिकेच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून शहरात प्लास्टिकचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. यावरून व्यापारी आणि कारवाई पथकातील कर्मचारी यांच्यात सातत्याने वादाचे प्रसंग घडत आहेत. पालिकेच्या पथकातील १० ते १५ जण अचानक छापा मारतात आणि तपासणी करतात. व्यापाऱ्यांशी आणि दुकानातील कर्मचाऱ्यांशी अरेरावीने बोलतात, मोठय़ा प्रमाणात दंड आकारतात, अशा स्वरूपाच्या तक्रारी पुढे येत आहेत. पिंपरी बाजारपेठेत काही दिवसांपूर्वी कारवाईवरून असाच वाद झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करण्याची भूमिका घेतली होती.

या संदर्भात भाजपचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. प्लास्टिक वापरावरून होणारी कारवाई नियमानुसार असली, तरी ५ हजार रुपयांपर्यंत दंड आकारणी करणे हे अन्यायकारक आहे, असे निवेदनात म्हटले आहे. करोनामुळे सर्वाचीच आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. त्यामुळे अवास्तव दंड आकारणी करू नये. या संदर्भात विशेष बैठक घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती करावी. प्लास्टिक उत्पादनावरच बंदी आणावी. जेणेकरून त्याचा वापर करण्याचा प्रश्नच येणार नाही. दुकानदार, व्यावसायिकांना कापडी पिशवी बंधनकारक करावे, असे उपाय करावेत, अशी मागणी आमदार लांडगे यांनी केली आहे.