मागणीच्या तुलनेत आवक अपुरी; पावसामुळे प्रतवारीवर परिणाम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : कोथिंबिरीच्या मागणीत वाढ झाली आहे. मागणीच्या तुलनेत आवक अपुरी पडत असल्याने कोथिंबीर महागली आहे. किरकोळ बाजारात एका जुडीचा दर २५ ते ३० रुपये असा आहे. गेल्या आठवडय़ात कोथिंबिरीच्या एका जुडीचा दर १० ते २० रुपये दरम्यान होता.

आठवडय़ापूर्वी पुणे शहर वगळता ग्रामीण भागात पाऊस सुरू होता. पावसामुळे कोथिंबिरीच्या प्रतवारीवर तसेच लागवडीवर परिणाम होतो. कोथिंबिरीला मागणी वाढली असून मागणीच्या तुलनेत आवक तशी कमी आहे. त्यामुळे आठवडय़ापूर्वी स्वस्त असलेल्या कोथिंबिरीच्या दरात वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात सध्या एका जुडीची विक्री २५ ते ३० रुपये दराने केली जात आहे. गेल्या आठवडय़ात किरकोळ बाजारात कोथिंबिरीच्या एका जुडीचा दर १० ते २० रुपये दरम्यान होता. त्यावेळी घाऊक बाजारात शेकडा कोथिंबिरीला ७०० ते ८०० रुपये असा दर मिळाला होता. मार्केटयार्डातील तरकारी विभागात सध्या  शेकडा कोथिंबिरीची विक्री १२०० ते १७०० रुपये दराने केली जात आहे, असे किरकोळ बाजारातील भाजीपाला विक्रेते प्रकाश ढमढेरे यांनी सांगितले.कोथिंबीरवगळता अन्य पालेभाज्यांचे दर कमी आहे. मुळा, कांदापातीला मागणी चांगली आहे. शेपू, पुदीना, मेथीला फारशी मागणी नाही. पावसाळा सुरू झाल्यानंतर कोथिंबिरीच्या प्रतवारीवर परिणाम होतो. त्यामुळे चांगल्या प्रतीच्या कोथिंबिरीला दर मिळतात. साधारणपणे कोथिंबिरीच्या लागवड होण्यास २१ ते २५ दिवस लागतात.

पालेभाज्यांचे जुडीचे  दर

* कोथिंबीर- २५ ते ३० रुपये

* मुळा- २५ ते ३० रुपये

* मेथी- १५ ते २० रुपये

* शेपू-१० ते १५ रुपये

* कांदापात- १५ ते २० रुपये

उपाहारगृहे बंद असल्याने फारशी दरवाढ नाही

दरवर्षी पावसाळ्यात चांगल्या प्रतीच्या कोथिंबिरीच्या आवकेवर परिणाम होतो. करोनाच्या संसर्गामुळे शहरातील उपाहारगृहे तसेच खाणावळी बंद आहेत. उपाहारगृहे आणि खाणावळी सुरू राहिल्या असत्या तर  कोथिंबिरीच्या एका जुडीचा  दर ३५ ते ४५ रुपये दरम्यान पोहोचले असते, असे किरकोळ बाजारातील विक्रेते प्रकाश ढमढेरे यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coriander rate increase in wholesale market zws
First published on: 05-08-2020 at 01:04 IST